Wed, Jun 26, 2019 12:06होमपेज › Pune › वय अवघे 15 अन् खुनाचा गुन्हा!

वय अवघे 15 अन् खुनाचा गुन्हा!

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 11 2018 12:48AMपुणे : पुष्कराज दांडेकर 

तो इयत्ता नववीत शिकतो. अभ्यासात हुशार.आई-वडील नोकरी करतात. दोघेही कामानिमित्त दिवसभर बाहेर. तो घरी आल्यावर अभ्यास करत असेल असा त्यांचा समज. अचानक एकेदिवशी सायंकाळी पोलिसांचा फोन येतो आणि आई-बाबांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याने मित्रांसोबत मिळून त्याच्या सवंगड्यावर किरकोळ कारणावरून चक्क कोयत्याने वार केले असे पोलिस सांगतात. येथून सुरू होतो त्याचा गुन्हेगारीचा प्रवास. अशीच काहीशी पालकांची धडधड वाढवणारी आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी परिस्थिती पुण्यात आहे. 

हातात पेन, पुस्तक, खेळण्याचे साहित्य घेऊन फिरण्याच्या वयातच मुलांच्या हातात तलवारी, कोयते, चाकू अशी जीव घेणारी हत्यारे दिसू लागली आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, विनयभंग, लैंगिक अत्याचार, जबरी चोरी अशा अनेक गंभीर गुन्ह्यात किशोरवयीन मुलांचा सहभाग दिसू लागला आहे, ही चिंतेची बाब आहे. पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार मागील पाच वर्षांत खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात 176, खुुनाच्या प्रयत्नात 300, चोरीमध्ये 1044, जबरी चोरीमध्ये 425  मुलांचा सहभाग होता. तर तीन वर्षात लैंगिक अत्याचाराच्या घटनेत 81 मुलांचा समावेश होता.  मागील पाच वर्षांत पुणे पोलिसांकडे दाखल वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये 4 हजारपेक्षा जास्त अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे. 

शानशौक, मौजमजा करण्याची हौस. गॅजेट्स, वाहने यांच्याबद्दलचे वाढते आकर्षण यामुळे चौदा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर नकळत गुन्हेगारी फोफावत  आहे. घर, शाळा, तसेच आसपासच्या परिसरातील माणसांचा प्रभाव या मुलांवर पडतो. त्याची परिणती अशा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये होते.  आई-वडीलांचे मुलांवर लक्ष नसल्याने त्यांच्यावर योग्य ते संस्कार होऊ शकत नाहीत. त्यांना लागलेली वाईट संगत, सवयी यांच्यावर लक्ष नसल्याने ते त्यात वाहवत जातात. त्यामुळे  मुलांकडून काही वेळा कळत नकळत गुन्हा घडतो. हल्ली किरकोळ कारणावरून मुलांमध्ये भांडणे तर होतच आहेत. मात्र, त्याचे रुपांतर हिंसक भांडणांमध्ये होताना दिसते आहे. काही वेळा किशोरवयीन मुले मोठ्या मुलांसोबत मैत्री करताना दिसतात. मात्र, त्यांच्याशी झालेल्या किरकोळ वादातही ते कोयते आणि तलवारीसारख्या हत्यारांचा वापर करून हल्ले केल्याची उदाहरणे समोर आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाढणारी हिंसकता आणि गुन्हेगारी वृत्ती रोखण्याचे मोठे आव्हान पालक आणि पोलिसांसमोर आहे. मात्र, केवळ शिक्षा किंवा दंडुक्याने हा प्रश्‍न सुटणारा नाही. त्यासाठी मुलांची पावले गुन्हेगारीकडे वळण्याआधी त्यांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे.