Sun, May 26, 2019 19:52होमपेज › Pune › बारावीनंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च शासनाकडून

बारावीनंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च शासनाकडून

Published On: Aug 07 2018 1:23AM | Last Updated: Aug 07 2018 1:05AMपिंपरी : प्रतिनिधी

मागासवर्गीय समाजातील इयत्ता बारावीनंतर आणि पदवीधर विद्यार्थांचा देश आणि परदेशातील शैक्षणिक खर्च सामाजिक न्याय विभाग करेल. शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी (दि.5) केले. 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकात झालेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्वाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात लोकशाहिर अण्णा भाऊ साठे कलारत्न पुरस्कार सोपान खुडे यांना  कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

या वेळी महापौर राहुल जाधव, ‘अ’ क्षेत्रीय समिती अध्यक्षा अनुराधा गोरखे, ‘फ’ क्षेत्रीय समिती अध्यक्षा कमल घोलप, शिक्षण मंडळ उपसभापती शर्मिला बाबर, नगरसेविका सुमन पवळे, प्रल्हाद सुधारे, साहित्यिक सोपान हरिभाऊ खुडे, समितीचे अध्यक्ष अरुण जोगदंड, अमित गोरखे, बापू घोलप, भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे आदी उपस्थित होते.  

दिलीप कांबळे म्हणाले की शहरात व्यवसाय करणार्‍या युवकांना मागासवर्गीय महामंडळाच्या वतीने 1 ते 10 कोटींचे कर्ज देण्यात येईल. शासन राबवित असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा व त्याबाबत इतरांना माहिती द्यावी. समहापौर जाधव म्हणाले की, समाजाने कायम एकसंध राहणे, समाजाच्या प्रवाहात येणे ही काळची गरज आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे सामाजिक कार्य या प्रबोधनपर्वाद्वारे करण्याचा प्रयत्न पालिकेने केला आहे.

साहित्यिक सोपान खुडे यांनी सत्काराला उत्तर दिले. ज्येष्ठ गझलकार चंद्रकांत धस यांचे अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. संमेलनामध्ये 40 ते 45 कवींनी सहभाग घेतला. सुहास घुमरे यांनी आभार मानले. अरुण जोगदंड यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब कोकाटे व किशोर केदारी यांनी सूत्रसंचालन केले. अनिल सौंदडे यांनी आभार मानले.