Tue, Apr 23, 2019 19:34होमपेज › Pune › वेश्यागमनानंतर दीड हजारासाठी महिलेला संपवले

वेश्यागमनानंतर दीड हजारासाठी महिलेला संपवले

Published On: Jun 05 2018 1:28AM | Last Updated: Jun 05 2018 1:20AMपुणे :  प्रतिनिधी

मुळा-मुळा नदीपात्रात पूना हॉस्पिटलच्या परिसरात पोत्यात हात-पाय बांधून टाकण्यात आलेल्या महिलेचा दीड हजारासाठी झालेल्या वादातून गळा आवळून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. तर, पुरावा नष्ट करण्यासाठी पोत्यात घालून मृतदेह दुचाकीवर आणून नदीपात्रात टाकला होता. धक्‍कादायक म्हणजे वेश्यागमन केल्यानंतर ठरलेली रक्‍कम देण्यावरून या महिलेला संपवण्यात आले आहे. मृत महिलेच्या हातावर गोंदलेल्या नावावरून तिची ओळख पटवित गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. 

सैदाब हमीद खान (23) व आबीद इम्रान खान (वय 22, दोघे मु. रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, मीरा ऊर्फ सीमा संजय वाघचौरे (वय-40, रा. भीमनगर, ता. दौंड, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.  

तीन दिवसांपूर्वी पूना हॉस्पिटलच्या परिसरातील नदीपात्रात हात-पाय बांधून पोत्यात टाकण्यात आलेला महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिस समांतर तपास करत होते. महिलेची ओळख पटविण्यात येत होती. महिलेच्या हातावर संजय असे नाव गोंदले होते. पोलिसांकडून बेपत्ता महिलांचा शोध सुरू होता. त्यावेळी युनिट एकचे कर्मचारी सुधाकर माने यांना स्टेशन परिसरातील एक महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तिच्या मैत्रिणीचा शोध घेतला. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर ती मीरा ऊर्फ सीमा संजय वाघचौरे असल्याचे समोर आले.

दरम्यान, पोलिसांनी महिलेला आलेल्या फोनची माहिती काढली. त्यानंतर या दोघांची माहिती समोर आली. बातमीदारामार्फत आरोपींचा माग सुरू केला. त्यानुसार, गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील, उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कमद, कर्मचारी तुषार खडके व त्यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.

सैदाब खान व आबीद खान हे मूळ उत्तर प्रदेशचे आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते पुण्यात राहण्यास आहेत. ते एफटीआयआयसमोरील प्रभात चाळीत वेल्डिंगचे काम करीत होते. दरम्यान, दोघेही मीरा उर्फ सीमा हिला ओळखत होते. त्यांनी गेल्या आठवड्यात (दि. 25 मे) सैदाब याने संबंधित महिलेस फोन करून साधू वासवानी चौकात बोलविले. त्यानंतर दुचाकीवर तिला चाळीतील घरी घेऊन आले. वेश्यागमन झाल्यानंतर दीड हजार रुपये देण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला.

‘मला माझे ठरलेले पैसे द्या, नाहीतर मी तुमची पोलिसांत तक्रार करेल’ असे सीमाने बजावले. त्यामुळे सुरुवातीला दोघेही घाबरले. नंतर मात्र त्यांनी तिचा गळा आवळून खून केला. तसेच, पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी तिचे हात-पाय बांधले. मृतदेह पोत्यात घातला. तसेच, तो दुचाकीवरून मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास म्हात्रे पूल परिसरातील नदीपात्रात टाक ल्याचे तपासात समोर आले आहे.