Mon, May 20, 2019 22:05होमपेज › Pune › मेट्रोने काम सुरू केल्यानंतर पालिकेस आली जाग

मेट्रोने काम सुरू केल्यानंतर पालिकेस आली जाग

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 13 2018 10:56PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर पुणे मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर पालिकेस जाग आली आहे. केवळ पालिका भवनासमोर वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित करून, गणेशोत्सवानंतर काम करण्याबाबतचे पत्र पालिकेने महारेल मेट्रो कॉर्पोरेशनला दिले आहे. मात्र, कामास अगोदरच विलंब झाला असल्याने आणखी दिरंगाई नको म्हणून मेट्रोने काम सुरूच ठेवले आहे. पालिका भवनासमोरील केवळ 400 मीटर रस्त्यावर वाहतूक कोंडींचा कांगावा पालिका प्रशासन करीत असल्याचे चित्र आहे. 

पालिका भवनासमोर दहा दिवसांपूर्वीपासून पुणे मेट्रोने काम सुरू केले आहे. त्यासाठी सर्व्हिस रस्त्यावर लोखंडी बॅरिकेड्स लावले गेले. ‘पिंपरी पालिका भवन मेट्रो स्टेशन’चे कामासाठी खोदकाम सुरू केल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. पुढील महिन्यात 13 ते 23 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव असून, तोपर्यंत काम करू नये. त्यानंतर काम सुरू करावे, असे पालिकेने मेट्रोला पत्र दिले. पालिका भवनासमोर केवळ 400 मीटर रस्त्याची चिंता पालिकेस असल्याचे या पत्रावरून दिसत आहे. खराळवाडी ते चिंचवडच्या मदर तेरेसा पुलापर्यंत मेट्रोने सर्व्हिस रस्त्यावर यापूर्वीच काम सुरू केले. त्यावेळी पालिका प्रशासन झोपले होते का, असा सवाल त्रस्त वाहनचालक उपस्थित करीत आहेत. 

मदर तेरेसा पुलाच्या पुढे आल्यानंतर गॅरेज, शॉपिंग मॉल, हॉटेल्स, बँका, खाद्यपदार्थ स्टॉल आदींमुळे वाहने रस्त्यावर थांबतात. पदपथावर बेशिस्तपणे वाहने उभी असतात. हाच प्रकार पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते खराळवाडीपर्यंत आहे. तेथे ये-जा करणार्‍या वाहनाचालकांना त्रास होत असल्याचे पालिका प्रशासनाला दिसले नाही का? त्याचबरोबर चिंचवड दिशेने जाताना शनी मंदिर, रॉक्सी हॉटेल, बँक ऑफ इंडिया, हॉटेल जिंजर, हॉटेल सिंट्रस, व्यापारी संकुल या ठिकाणी दुहेरी मोटार पार्किंग केली जाते. तसेच, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. संपूर्ण चौकात बेशिस्त रिक्षाचालकांची ‘दादागिरी’ चालते.  

येथून जाताना अक्षरशः कसरत करावी लागते. या प्रकाराकडे पालिका प्रशासन व वाहतूक पोलिस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. पिंपरी चौक आणि मोरवाडी चौकात मेट्रोने बीआरटीएस लेनमधून एप्रिल महिन्यात काम सुरू केले होते. यासंदर्भात ‘पुढारी’ने छायाचित्रासह वृत्त दिल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. त्यानंतर मेट्रोला बीआरटीमधून काम न करण्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर मेट्रोने मार्ग बदलत तो बीआरटीबाहेरून घेतला आहे. मात्र, पिंपरी चौक ते मदर तेरेसा पुलापर्यंत बीआरटी मार्गावर मेट्रोने खोदकाम सुरू असून, मेट्रोचे पिलर उभे केले जात आहेत.   

विलंब होऊ नये म्हणून काम सुरू

पुणे मेट्रोचे कामास पूर्वीच विलंब झाला आहे. पालिकेच्या सूचनेवरून सर्व्हिस रस्त्यावर मेट्रोचा मार्ग बदलला आहे. त्यात आणखी तब्बल दीड महिना काम बंद ठेवणे मेट्रोला परवडणारे नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पास अधिक विलंब होण्याची शक्यता आहे. सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेऊन काम केले जात आहे. तसे पत्र पालिकेस दिले आहे, असे पुणे मेट्रोच्या अधिकार्‍यांनी सांगितले.