Tue, Mar 19, 2019 03:13होमपेज › Pune › अखेर स्कूलबसवर कारवाई सुरु

अखेर स्कूलबसवर कारवाई सुरु

Published On: Jun 30 2018 1:44AM | Last Updated: Jun 30 2018 1:35AMपुणे : प्रतिनिधी

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना वाहन योग्यता प्रमाणपत्र नसणे, वैध परवाना न बाळगणे, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणे, स्कुलबस नियमावलीची पूर्तता न करणार्‍या स्कूलबसवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी (दि. 29) धडक मोहिमेत केलेल्या तपासणीत 59 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 24 वाहनांना अटकावून ठेवण्यात आले आहे. 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना स्कुलबसची पुनफिर्र्टनेस तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश शाळेच्या स्कूलबस चालकांनी  वाहनांची पुनफिर्र्टनेस न करता बेकायदेशीररित्या विद्यार्थ्यांची ने-आण केली जात होती. त्यापार्श्‍वभूमीवर आरटीओ अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी शहरतील विविध शाळा आणि रस्त्यांवरुन धावणार्‍या स्कूलबसची तपासणी केली. धडक मोहिमेदरम्यान 14 पथकाद्वारे स्कूलबस तपासणीस प्राधान्य देण्यात आले. तर कारवाई दरम्यान 220 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 59 स्कूलबस वाहने दोषी आढळून आली असून, त्यापैकी 24 वाहने आरटीओ कार्यालयात अटकावून ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये 17 खासगी आणि 7 शालेय वाहनांचा समावेश आहे. 

स्कूलबस नियमावलीप्रमाणे वाहनचालकांनी विद्यार्थ्याची वाहतूक करणे आवश्यक आहे. मात्र, आरटीओच्या आवाहनानंतर बसमालकांनी  पुनफिर्र्टनेस करण्यासाठी कोलदांडा दिला आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाकडून धडक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, सर्व परवानाधारक वाहतूकदारांनी स्कुलबस नियमावलीचे पालन करावे. शालेय प्रशासन व बस कंत्राटदार यांनी परस्पर सामंज्यस करार करावेत. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही याची दक्षता पालकांसहित वाहतूकदारांनी घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी केले आहे.  स्कूलबसवर कारवाईमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांच्यासह अनेक कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता.

जागो पालक जागो

अनफिट स्कुलबसद्वारे विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यार्‍या पालकांना जागृत करण्यासाठी रेडिओच्या माध्यमातून जागो पालक जागो कार्यक्रमातंर्गत संवाद साधला जात आहे. त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत पालकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबद्दल जागृत करत आहेत.