Mon, May 20, 2019 10:30होमपेज › Pune › चिल्लरसाठी नडला; पाच हजाराला बुडाला

चिल्लरसाठी नडला; पाच हजाराला बुडाला

Published On: Jun 21 2018 10:43AM | Last Updated: Jun 21 2018 10:43AMपुणे : प्रतिनिधी

बस प्रवासादरम्यान प्रवाशाला सुटे पैसे (चिल्लर) देण्यासंदर्भातचा वाद पीएमपीएल वाहकाला तब्बल पाच हजार रुपयांना पडला आहे. तीन  ते चार प्रवाशांना तिकीट दिल्यानंतर सुटे पैसे परत न देता  प्रवाशांशी वाद घालणार्‍या वाहकावर पीएमपीएल प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. एप्रिल महिन्यात हडपसरस्वारगेट बसप्रवासादरम्यान ही घटना घडली आहे.

शहरातील नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर  आहे. प्रवासादरम्यान अनेकदा प्रवासी आणि वाहकांमध्ये  विविध कारणांवरून वादावादी होते. विशेषतः  थांब्यावर बस उभी करण्यासाठी बेल न देणे, महिला प्रवाशांना जागा उपलब्ध करून न देणे, सुटे पैसे नसणे या कारणांवरून वाहक, चालकाशी वाद होतात बस  मार्गावरून जात असताना वाहकाजवळ सुटे पैसे नसल्यास प्रवाशांना पैसे देणे शक्य होत नाही. परिणामी वादाचे रूपांतर तक्रार देण्यापर्यंत पोहचते. 

प्रवाशांना सुटे पैसे परत न देणार्‍या संबंधित बसवाहकाकडून सलग तीन ते चार घटना घडल्याने प्रवासी आणि वाहकांमध्ये वादावादी झाली होती. हा प्रकार वारंवार घडत असल्याने चालकानेच संबंधित  वाहकाविरोधात डेपो व्यवस्थापकाकडे तक्रार केली.  त्यानंतर डेपो व्यवस्थापकाने हा प्रकार गांभीर्याने घेऊन पीएमपी प्रशासनाकडे प्रकरण चौकशीसाठी हस्तांतरित केले  होते. त्यानंतर पीएमपीएलच्या  चौकशी समितीने संबंधित चालकाचा जबाब घेऊन तपास केला. त्याचबरोबर पुराव्याची तपासणी करण्यात आली.