Tue, May 21, 2019 18:10होमपेज › Pune › 110 वर्षांनंतरही  राजगुरू स्मारकाची उपेक्षाच 

110 वर्षांनंतरही  राजगुरू स्मारकाची उपेक्षाच 

Published On: Aug 24 2018 12:52AM | Last Updated: Aug 24 2018 12:46AMराजगुरुनगर : कोंडीभाऊ पाचारणे

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जयंती शुक्रवारी (दि. 24) शहरात विविध उपक्रम, कार्यक्रमांनी साजरी होणार आहे. हुतात्मा राजगुरू यांच्या बलिदानाला 88 वर्षे पूर्ण झाली; तर उद्याची 110 वी जयंती साजरी होत आहे. या 110 वर्षांनंतरही हुतात्मा राजगुरू यांचे जन्म ठिकाण असलेल्या त्यांच्या वाड्याचे नियोजित राष्ट्रीय स्मारकाचे काम पूर्णपणे दुर्लक्षित आहे. स्मारकाबद्दल शासकीय आणि राजकीय स्तरावर प्रचंड अनास्था, उदासीनता दिसून येत असून हुतात्मा राजगुरूप्रेमी नागरिक, युवकांमधून संताप व्यक्त होत आहे.  
भगतसिंग, सुखदेव यांची पंजाब प्रांतात भव्य स्मारके उभारली गेली. शासकीय स्तरावर जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम होतात. महाराष्ट्रात हुतात्मा राजगुरूंसह इतर क्रांतिकारकांची अद्यापही उपेक्षाच होत आली आहे. राजगुरुनगर येथील भीमा नदी काठावर हुतात्मा राजगुरू यांचा पुरातन वाडा आहे. देशभक्तीची अखंड प्रेरणा देणार्‍या या वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावे अशी राजगुरुनगर शहरासह तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे. काही राजगुरूप्रेमी, संस्था यांनी अनेक वर्ष पाठपुरावा केल्यावर या स्मारकाची घोषणा झाली खरी; मात्र कार्यवाहीबाबत हे नियोजित स्मारक अनेकदा लाल फितीत अडकल्याचे पाहायला मिळत आहे. 

युती सरकारच्या फक्त घोषणा 

दहा वर्षांपूर्वी आघाडी सरकारच्या काळात वाड्यातील जन्मखोली, अर्धाअधिक थोरला वाडा आणि संरक्षक भिंतीचे काम झाले. त्यातही अनेक त्रुटी राहात गेल्याने वाद झाले. आंदोलने झाली. सध्याच्या सरकारने सत्तेत येताना स्मारकाबद्दल अनेक मोठ्या घोषणा केल्या. स्मारकाचा ऑक्टोबर 2014 मध्ये 87 कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित केला. चार वर्षात त्यातील एकही बाब प्रत्यक्षात आली नाही. मुख्यमंत्री, पालकमंत्री यांची शिखर बैठक होऊन त्यात मान्यता मिळणे बाकी आहे. त्यानंतरच या कामाला गती येणार आहे. हुतात्मा राजगुरू स्मारक समिती, राजगुरुनगर नगरपरिषद यांच्या माध्यमातून ही बैठक व्हावी म्हणून अनेकदा प्रयत्न झाले. मात्र चार वर्षे उलटूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर आणि हुतात्मा राजगुरू स्मारकाचा आराखडा एकाच वेळी प्रस्तावित करण्यात आला होता. भीमाशंकर देवस्थानच्या आराखड्याला मान्यता मिळून कामेही सुरू झाली. स्मारकाचा मात्र राज्यकर्त्यांना विसर पडला. दुर्दैवाने देशासाठी दिलेले बलिदानही राजकीय कुरघोडीत मागे पडले.