Tue, Nov 13, 2018 00:34



होमपेज › Pune › तब्बल 11 दिवसांनी ‘तो’ सापडला सुखरूप

तब्बल 11 दिवसांनी ‘तो’ सापडला सुखरूप

Published On: Jul 02 2018 1:47AM | Last Updated: Jul 02 2018 1:31AM



पुणे : हिरा सरवदे

‘तुमचा मुलगा सिंहगडाच्या पायथ्याशी जखमी आवस्थेत सापडला असून, तो सुखरूप आहे,’ असा एक फोन आला आणि ‘त्या’च्या आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंचा पूर ओसंडला. शोध घेऊनही अकरा दिवसांपासून मुलगा सापडत नसल्याने हतबल झालेल्या आई-वडिलांना या एका फोनने आभाळ ठेंगणे झाले होते. जखमी तरुणास झोळीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करणार्‍या आतकरवाडीतील नागरिकांच्या या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

फुलचंद कांबळे (रा. उत्तमनगर, शिवणे, मूळ देवी हल्लाळी, ता. निलंगा, जि. लातूर) हे एनडीएमध्ये नोकरी करतात. त्यांचा मुलगा अनिल (वय 22) हा माळवाडी येथील एका महाविद्यालयात कला शाखेच्या दुसर्‍या वर्षाचा अर्ज भरण्यासाठी 19 जून रोजी सकाळी घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परत न आल्याने फुलचंद कांबळे यांनी, अनिल बेपत्ता झाल्याची तक्रार उत्तमनगर पोलिस चौकीत दाखल केली होती. तेव्हापासून त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. अनिलचे मित्रही त्याचा शोध घेऊन थकले होते.

भाऊसाहेब सांगळे (रा. सिंहगड पायथा, आतकरवाडी) हे लाकडे गोळा करण्यासाठी रविवारी सकाळी सिंहगड पायथ्याला असलेल्या मोठी दरी यथे गेले असता, एक तरुण तेथे बेशुद्ध अवस्थेत पडलेलेला त्यांना दिसला. तो जिवंत असल्याची खात्री पटताच त्यांनी गावातील जयभवानी तरूण मंडळाच्या कार्यकर्तांना माहिती दिली. त्यानंतर उपसरपंच किसन पढेर, योगेश सांगळे, महेश सांबरे, सचिन पढेर, सूरज कुंभारकर, दत्ता सांगळे, योगेश पढेर, ओंकार भाडळे, सूरज पन्हाळकर, सागर पन्हाळकर, संदीप भोंडेकर, भानुदास सांबरे, रवींद्र कांबळे, अक्षय पांढरे यांनी पाण्याची बाटली, बिस्कीट पुडे, झोळी, आदी साहित्य घेऊन घटनास्थळ गाठले व त्याला झोळी करून गावात आणले व खडकवासला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

शुद्धीवर आल्यानंतर त्याने स्वतःची व कुटुंबाची माहिती दिली. त्यानंतर या नागरिकांनी घडला प्रकार अनिलच्या कुटुंबियांना सांगितला. कांबळे यांनी रुग्णालयात येऊन मुलास विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळू शकला नाही. सध्या अनिलवर उपचार सुरू असून तो त्या दरीत कसा गेला, याबाबतची स्पष्टता अद्याप तरी झालेली नाही. जे सत्य असेल ते अनिल पूर्णपणे बरा झाल्यानंतरच समोर येणार आहे.