Sun, Mar 24, 2019 17:13होमपेज › Pune › एआयसीटीईची मान्यता नसणार्‍या महाविद्यालयांची संलग्नता होणार रद्द

एआयसीटीईची मान्यता नसणार्‍या महाविद्यालयांची संलग्नता होणार रद्द

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 12:57AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असणार्‍या व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रम चालविणार्‍या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता घ्यावी लागेल. अन्यथा मान्यता न घेणार्‍या महाविद्यालयांची येत्या शैक्षणिक वर्षापासून संलग्नता रद्द करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बुधवारी दिली.

विद्यापीठातर्फे  आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. करमळकर यांनी माहिती दिली. या वेळी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण आदी उपस्थित होते. ‘एआयसीटीई’ने व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रम चालविणार्‍या महाविद्यालयांना मान्यता घेण्याबाबत सूचना प्रकाशित केली आहे. मात्र, महाविद्यालये ही मान्यता घेण्याबाबत टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, विद्यापीठ प्रशासन महाविद्यालयांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण मंडळाने स्पष्ट केले होते.

यासंदर्भात डॉ. करमळकर म्हणाले, की गेल्या वर्षी विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या काही महाविद्यालयांनी व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रम चालविताना एआयसीटीईची मान्यता घेतली नसल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित महाविद्यालयांना मान्यता घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. यंदा एआयसीटीईने मान्यता देण्याबाबतची नियमावली शिथिल करून नियमावलीतील जाचक अटी शिथिल केल्या आहेत.  त्यामुळे महाविद्यालयांनी ही मान्यता न घेतल्यास विद्यापीठ प्रशासन महाविद्यालयांची संलग्नता रद्द करणार आहे.

बहि:स्थ विद्यार्थ्यांना मिळणार सुविधा...

विद्यापीठातील बहि:स्थ विभागामध्ये बहि:स्थ विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक विद्यापीठ कायद्याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीकडे एका महिन्यापूर्वी पाठविला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांमध्ये त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे शहराध्यक्ष कल्पेश यादव आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे  शहराध्यक्ष ऋषी परदेशी यांनी पाठपुरावा केला होता.