Thu, Jan 17, 2019 03:55होमपेज › Pune › जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील कामकाजावर वकिलांचा बहिष्कार

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील कामकाजावर वकिलांचा बहिष्कार

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:35AMपुणे ः प्रतिनिधी 

उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्याला न मिळाल्याच्या निषेधार्थ पुणे बार असोसिएशनच्या वतीने गुरुवारी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत कामाकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र दौंडकर यांनी दिली.  

शिवाजीनगर येथे कौटुंबिक न्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांच्यापुढे पुण्याला खंडपीठ मिळावे, या मागणीचे समर्थन केले होते. न्या. चेल्लूर यांच्यापुढे म्हणणे मांडण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, असे सांगितले होते. पुण्याकडून वारंवार खंडपीठासाठी मागणी करण्यात येत असताना देखील दुर्लक्ष करण्यात आले. त्याबरोबरच पुण्याला खंडपीठ न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा हवेतच विरली. पुण्याच्या मागणीचा विचार न करण्यात आल्याच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्ह्यातील कामकाजावर बहिष्कार घालण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. दौंडकर म्हणाले.  

कोल्हापूरला खंडपीठ मिळाल्याचे वकील वर्गातून स्वागत करण्यात येत असून, त्याबरोबर पुण्यालाही खंडपीठ मिळणे आवश्यक होते. पुण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पुण्यातील वकिलांनी त्यांच्या मागणीकडे झालेल्या दुर्लक्षाबद्दल निषेध व्यक्‍त करण्यासाठी गुरुवारी न्यायालयातील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दिशा ठरविण्यासाठी गुरुवारी न्यायालयात वकील वर्गाच्या उपस्थितीत पुढील नियोजनावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. हेमंत झंजाड यांनी दिली.