शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर प्रशासक संचालक मंडळ अखेर बरखास्त

Last Updated: Oct 11 2019 1:51AM
Responsive image

Responsive image

पुणे : प्रतिनिधी 
‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने (आरबीआय) आर्थिक अनियमिततेमुळे येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर अखेर कारवाई केली आहे. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासक नेमण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

‘आरबीआय’च्या आदेशानुसार सहकार आयुक्‍त सतीश सोनी यांनी संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर पुणे शहर जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांची प्रशासक म्हणून नियुक्‍ती केली आहे. त्यांनी गुरुवारी (दि.10) दुपारी प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यामुळे बँकेचे माजी अध्यक्ष आमदार अनिल भोसले यांच्या अधिपत्याखालील या बँकेला जोरदार चपराक बसलेली आहे. दरम्यान, बँकेने थकीत 275 कर्जदारांबाबत सहकार विभागाकडून 101 चे दाखले मिळविले आहेत. याबाबत जप्तीच्या कारवाईची प्रकरणे जिल्हाधिकारी स्तरावर असून, ही रक्‍कम सुमारे 227 कोटी रुपये असल्याची माहिती प्रशासकांकडून देण्यात आली.

‘आरबीआय’ने 26 एप्रिल 2019 रोजी या बँकेची विशेष छाननी केलेली होती. त्या वेळी बँकेच्या कामकाजात गंभीर चुका, अनियमितता आढळून आल्या होत्या. त्यानंतर बँकेवर 3 मे 2019 रोजी आर्थिक निर्बंध लादण्यात आले. खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढता येत आहेत. हे निर्बंध 4 नोव्हेंबरपर्यंत आहेत. दरम्यान, ‘आरबीआय’ने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याबाबतचे आदेश 7 ऑक्टोबर 2019 रोजी जारी केले. त्यानुसार, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 110-अ मधील तरतुदीनुसार, सहकार आयुक्‍त सोनी यांनी 9 ऑक्टोबर रोजी आदेश जारी केलेले आहेत.

बँकेवरील संचालक मंडळाचा कालावधी हा आर्थिक वर्ष 2015-2020 असा होता. तर 20 ऑगस्ट 2015 रोजी संचालक मंडळ निवडून आलेले होते. ‘आरबीआय’च्या आदेशानुसार बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करताना असलेल्या 12 जणांच्या संचालक मंडळाची नावे पुढीलप्रमाणे ः शहाजी बाबूराव रानवडे (उपाध्यक्ष), संचालक - हनुमान बबनराव सोरटे, विष्णू तुकाराम जगताप, सतीश मारुती कुसमोडे, सूर्याजी पांडुरंग जाधव, नितीन रघुनाथ तुपे, प्रकाश बापूसाहेब जंगम, विजय नामदेव आल्हाट, विश्वास सीताराम गौडूर, हनुमंता करिअप्पा हुस, श्रीकांत भार्गव कुलकर्णी, रमेश दत्तात्रय हांडे (तज्ज्ञ संचालक).

शिवाजीराव भोसले बँकेवर ‘आरबीआय’ने निर्बंध लादल्यानंतर ठेवीदार, खातेदारांना रक्‍कम मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या बँकेबाबत सुधीर रामचंद्र आल्हाट; तसेच पुणेकर नागरिक कृती समितीचे सचिव मिहिर थत्ते यांनी ‘आरबीआय’सह सहकार विभागाकडे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्‍तीची मागणी सातत्याने लावून धरली होती.

‘आरबीआय’च्या आदेशान्वये सहकार आयुक्‍तालयाने शिवाजीराव भोसले बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकपदी माझी नियुक्‍ती केली आहे. बँकेचा पदभार घेतला असून, थकीत कर्जांच्या वसुलीसाठी त्वरित अधिकार्‍यांची बैठक घेतली आहे. जास्तीत जास्त थकीत कर्जे वसुलीसाठी प्रयत्न करणार आहे.
- नारायण आघाव, 
प्रशासक, शिवाजीराव भोसले सहकारी बँक लिमिटेड, पुणे.

भोसले यांचे संचालक पद या पूर्वीच रद्द

बँकेचे संचालक अनिल शिवाजीराव भोसले आणि रेश्मा अनिल भोसले यांनी स्वतःच्या जागा बँकेला भाड्याने दिल्यामुळे तत्कालीन सहकार आयुक्‍त विजयकुमार झाडे यांनी त्यांचे संचालक पद या पूर्वीच रद्द केले होते. याप्रकरणी सुधीर रामचंद्र आल्हाट यांनी सहकार आयुक्‍तांकडे तक्रार केली होती. भोसले यांनी सहकार मंत्र्यांकडे त्यावर अपील केले असता, 20 सप्टेंबर रोजी सहकार मंत्र्यांनी स्थगिती आदेश दिले होते; तसेच मुंबई उच्च न्यायालयातही प्रकरण गेले होते. दरम्यान, याबाबतचे अपील महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर चालले असता, त्यांनी सहकार आयुक्‍तांचे 13 सप्टेंबर 2017 रोजीचे आदेश, 17 डिसेंबर 2018 रोजी कायम केले होते. त्यामुळे बरखास्त करण्यात आलेल्या संचालक मंडळात भोसले यांचे नाव नाही. 

फरार विजय मल्ल्याचे इंग्लंडकडून भारताला प्रत्यार्पण


मुंबईत राजकीय वादळ; वंचितच्या 'या' दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश


कोल्हापूर : नवे १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले; रुग्ण संख्या ६४२ वर


निसर्ग चक्रीवादळाने पेणला झोडपले


पुणे : दहा लाखांच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण, गुन्ह्याची मुख्य सुत्रधार बारामतीची महिला


जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, एका दिवसात ७१ पॉझिटिव्ह 


शिवराज्याभिषेकासाठीचे पवित्र जल संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द


शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने घेतले 'हे' महत्वाचे निर्णय! 


रायगड : रोह्यात चक्रीवादळाने हाहाकार


चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी