Sun, Mar 24, 2019 08:18होमपेज › Pune › प्रशासन आणि राजकर्त्यांनी समन्वयाने काम करावे 

प्रशासन आणि राजकर्त्यांनी समन्वयाने काम करावे 

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 12:53AMपिंपरी : प्रतिनिधी

राजकीय व प्रशासकीय पाठबळ असल्याशिवाय विकासकामे पूर्ण होऊ शकत नाहीत. प्रशासकीय व्यवस्था, राजकीय व्यवस्था व समाजकारण या तीनही गोष्ट एकत्र आल्यास व प्रशासन व राजकीय व्यवस्था यांचा समन्वय साधल्यास झपाट्याने विकास होईल, असे मत आदर्श गाव प्रकल्प योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. 

चिंचवड येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभाग व श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने श्यामची आई गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पोपटराव पवार बोलत होते. या वेळी मध्य प्रदेशमधील उज्जेैन येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेले संकेत भोंडवे व त्यांच्या मातोश्री सुमन भोंडवे यांना अनुक्रमे श्याम व श्यामची आई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य, डॉ. डी. वाय, पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, निवृत्त विभागीय आयुक्त दिलीप बंड,  शिक्षण भूषण रामचंद्र जाधव, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

पवार यांनी या वेळी  भोंडवे यांच्या कार्याचा गौरव केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठबळामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासास मोठा हातभार लागला आहे. त्यामुळे नोकरशाही व राजकारण यांचा समन्वय असणे आवश्यक असून, संकेत भोंडवे यांनी याच पद्धतीने काम केल्यामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, अशा शब्दांत पवार यांनी संकेत भोंडवे यांच्याबद्दल गौरवोद‍्गार काढले. 

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. नोकरशाही व राजकीय व्यवस्था यांचा समन्वय कसा होईल याबाबत विचार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी सत्कारार्थींची प्रश्‍नोत्तरवजा मुलाखत घेतली. चंद्रकांत दळवी यांनी या वेळी संकेत भोंडवे यांच्या कामाचे कौतुक केले. सूत्रसंचालन अनिल कातळे यांनी केले. प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले.

संकेत भोंडवे यांचा शहरवासीयांना अभिमान ः डॉ. पी. डी. पाटील

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहर हिरवेगार  झाले आहे. त्याचे श्रेय संकेत भोंडवे यांचे वडील  कै. शांताराम भोंडवे यांना जाते. संकेत भोंडवे यांचे विशेष कौतुक वाटते, संकेत यांनी राज्याबाहेर जाउन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव उंचावले आहे; तसेच आपले कर्तृत्व सिद्ध करणे सोपी गोष्ट नसून संकेत भोंडवे यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे, यामुळे शहरवासीयांना त्यांचा कायम अभिमान वाटत राहील. या वेळी त्यांनी सुमन भोंडवे यांच्या भारतीय संस्कृतीची रत्नमाला या पुस्तकाचे विशेष कौतुक केले.