Tue, Mar 19, 2019 15:34होमपेज › Pune › संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करा

संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करा

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 13 2018 1:08AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यातील माध्यमिक शाळांना 2014 ते 2018 दरम्यानच्या संचमान्यता शिक्षणाधिकार्‍यांच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांमध्ये अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. याचसाठी अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांचे पहिल्यांदा संस्थास्तरावरील संस्थांतर्गत व शेवटी जिल्हास्तरावर ‘समायोजन पोर्टल’च्या माध्यमातून समायोजन करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक गंगाधर म्हमाणे यांनी सर्व जिल्हा परिषदा, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांना दिले आहेत. 

म्हमाणे यांनी दिलेल्या आदेशानुसार, संस्थास्तरावरील संस्थांतर्गत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना संस्थांनी माध्यमिकचे शिक्षक जास्तीत जास्त कार्यरत राहतील याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी नववी किंवा दहावीच्या गटातील शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यांचे समायोजन त्याच गटात अन्य शाळांमध्ये करावे, तसे शक्य नसल्यास 6 वी ते 8 वीच्या गटात करावे. 6 वी ते 8 वीच्या गटातील अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांना शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन 5 वीच्या गटात समायोजित करावे. शिक्षकांना अतिरिक्त ठरवताना शक्यतो 5 वीच्या खालच्या गटातील शिक्षक अतिरिक्त ठरवावेत. क्राफ्ट, संगीत, तबलजी या विषयांच्या शिक्षकांचे संस्थांतर्गत समायोजन करणे शक्य असले तरच त्यांचे समायोजन करण्यात यावे; अन्यथा त्यांना त्याच शाळेत कार्यरत ठेवावे.

या शिक्षकांचे संस्थाच्या बाहेरील शाळांमध्ये समायोजन होणार नाही. त्यामुळे त्यांना अतिरिक्त ठरवू नये. तसेच 30 सप्टेंबर अखेर सेवानिवृत्त होणार्‍या शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये. जे शिक्षक 2016-17 पूर्वी अतिरिक्त ठरले आहेत. परंतु त्यांचे अद्याप समायोजनच झाले नसल्यामुळे ते मूळ शाळेतच कार्यरत आहेत. अशा शिक्षकांना पुन्हा अतिरिक्त ठरविण्यात यावे. फक्त याबाबत शाळा तसेच संस्थांनी खात्री करून नावे कळवावीत. 2017-18 च्या संचमान्यतेनुसार जिल्हास्तरावरील समायोजनाकरिता अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक शाळांची अतिरिक्त शिक्षकांची यादी व रिक्त पदांची माहिती माध्यमिक शिक्षण संचालनालयास येत्या 20 ऑगस्टपूर्वी कळविण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहेत. समायोजनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करावेत, असेदेखील संबंधित अधिकार्‍यांना म्हमाणे यांनी सांगितले आहे.