होमपेज › Pune › महसूल विभागातील कामकाज अतिरिक्‍त पदभारावर

महसूल विभागातील कामकाज अतिरिक्‍त पदभारावर

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 22 2018 11:33PMपुणे : समीर सय्यद

जिल्हा प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या नायब तहसीलदारांची शहर आणि जिल्ह्यात विविध शाखांमधील 29 पदे रिक्‍त आहेत. या रिक्त पदांमुळे कर्तव्यावर असलेल्या नायब तहसीलदारांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. त्यामुळे सध्या करत असलेले काम आणि त्यातच दुसरीकडील पदभारामुळे नायब तहसीलदारांची डोकेदुखी वाढली आहे. हे कमी म्हणून जिल्हा प्रशासनात क्‍लर्क, तलाठी, अव्वल कारकून यांची 228 पदे रिक्त आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनातील बहुतांश कामकाज अतिरिक्त पदभारावरच चालत असल्याचे दिसून येत आहे.

महसूल प्रशासनातील शेवटचा शासकीय प्रतिनिधी म्हणून तलाठी गावपातळीवर काम करतो. जिल्ह्यात 616 तलाठ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, 40 पदे रिक्‍त असून, तलाठ्यांवर लक्ष ठेवणार्‍या मंडल अधिकार्‍यांची 119 पदे मंजूर असून,  त्यापैकी 13 पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे तलाठी आणि मंडल अधिकार्‍यांना अनेक ठिकाणचा अतिरिक्त पदभार स्वीकारावा लागत आहे. त्यानंतर महसूल विभागातील कार्यालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या अव्वल कारकुनांची 17 पदे रिक्‍त असून, 303 पदे मंजूर आहेत. जिल्ह्यासह शहरातील तहसील कार्यालयामध्ये 57 नायब तहसीलदारांची पदे मंजूर असून, त्यापैकी 18 आणि उपविभागीय अधिकारी कार्यलय, भूसंपादन अधिकारी, अन्नधान्य वितरण कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांमधील 11 अशी एकूण 29 नायब तहसीलदारांची पदे रिक्‍त आहेत. रिक्‍त पदांचे कामकाज उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांवर अतिरिक्‍त टाकण्यात आले आहे.  

महसूल प्रशासनातील कामकाजात क्लार्क (लिपिक टंकलेखक) महत्त्वाची भूमिका बजावतात. 446 क्लर्कची पदे मंजूर असून, त्यापैकी 108 पदे रिक्‍त आहेत. उपजिल्हाधिकार्‍यांची 2 पदे रिक्‍त असून, नायब तहसीलदरांची केवळ दोन टक्के पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे उपस्थित अधिकार्‍यांवर अतिरिक्‍त कामाचा ताण येत आहे. जिल्ह्यात 323 नवीन तलाठी आणि 56 मंडल कार्यालयांची भर पडणार आहे. यापूर्वीची पदे भरण्यास सरकारने मान्यता दिली नसल्याने या नवीन निर्माण होत असलेल्या तलाठी आणि मंडल अधिकार्‍यांची पदे भरण्याची परवानगी मिळणे सध्या तरी शक्य वाटत नसल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. 

महसूलमंत्र्यांची घोषणा हवेतच

राज्यात तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून, आहेत तेवढ्याच तलाठ्यांवर कामकाज चालविले जात आहे. हे पाहून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये राज्यात चार हजार तलाठ्यांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, सव्वा वर्ष झाले तरी या भरतीवर कोणताही निर्णय घेतला गेला नाही.

केवळ 69 जागांसाठी जाहिरात

तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांची राज्यात शेकडो पदे रिक्‍त आहेत. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत यंदा केवळ 69 पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये तहसीलदार गट अ पदाच्या केवळ 6 जागा आहेत, तर उपजिल्हाधिकारी पदाची एकही जागा नाही.