Mon, Jun 17, 2019 03:08होमपेज › Pune › सरकारी अनास्थेने पोलिस दलाने गमावला उत्कृष्ट अधिकारी

सरकारी अनास्थेने पोलिस दलाने गमावला उत्कृष्ट अधिकारी

Published On: May 13 2018 2:16AM | Last Updated: May 13 2018 1:28AMपुणे : देवेंद्र जैन

राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक असलेले व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सरकारच्या कारभाराला कंटाळून 6 वर्षे शिल्लक असतानाच स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केल्याने पोलिसदलात खळबळ उडाली आहे. त्यांचा निवृत्तीचा अर्ज सरकारने मंजूर करू नये यासाठी अनेकांनी विनंत्या केल्या; पण गृहखात्याची काळजी नसलेल्या मुख्यमंत्र्यांनी या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्षच दिले नाही. या उलट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील भ्रष्ट कारभाराने बदनाम असलेल्या अनेक अधिकार्‍यांना महत्त्वाच्या पदांवर नेमणुका देण्यात आल्याने सरकार भ्रष्टाचाराच्या विरोधात खरेच गंभीर आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

देशातील अनेक सरकारी आस्थापनांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारे वि. वि. लक्ष्मीनारायण यांचा या प्रकारात एका अर्थाने बळी गेला, असेच म्हणावे लागेल. आपल्या कामातून लक्ष्मीनारायण यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात किल्ला लढवून अनेक रथी-महारथींना कारागृहाचा दरवाजा दाखवला होता. महाराष्ट्रात त्यांनी अनेक ठिकाणी काम केले होते. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकाळात त्यांनी महत्त्वाच्या कामगिरी बजावल्या होत्या. भाजपने जेव्हा राज्यात सरकार स्थापन केले, तेव्हा या अधिकार्‍याचा, कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता मोठा उपयोग सरकार करेल असे वाटले होते. मात्र तसे काही झाल्याचे दिसून येत नाही.

मुंबई अतिरेकी हल्ल्यामध्ये निकृष्ट बुलेट प्रुफ जॅकेटमुळे अनेक वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचा बळी गेला. त्यानंतर लक्ष्मीनारायण यांनी योग्य जॅकेट्सकरिता निविदा मागवल्या होत्या, त्यामध्ये पुरवठा केलेले हजारो निकृष्ट जॅकेट त्यांनी संबंधित पुरवठादारांना परत पाठवून मोठा दणका दिला. हीच बाब बहुतेक सरकार अथवा पुरवठादारांना मान्य झाली नसावी, त्यावरून मोठा वादंग माजला व भ्रष्टाचाराने पोखरलेल्या या यंत्रणेबरोबर त्यांना काम करणे अशक्य झाले व त्यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, योगायोगाने लक्ष्मीनारायण यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेला असतानाच दुसरीकडे त्यांचा मुलगा व्ही. व्ही. साई प्रणित हा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. आता साई प्रणित, आपल्या वडिलांच्या मार्गावरुन वाटचाल करुन आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार का, याकडे लक्ष असेल.

सद्यःस्थितीत सरकारने राज्याच्या पोलिस दलात असलेल्या अनेक प्रामाणिक व कार्यक्षम अधिकार्‍यांना साईड पोस्ट देउन, बाजूला ठेवले आहे. याउलट भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अग्रगण्य असलेल्या अनेकांना महत्त्वाच्या पदांवर सरकारने नेमणुका केल्या आहेत. या भ्रष्ट अधिकार्‍यांमुळे पोलिसदलातील भ्रष्टाचार संपण्याऐवजी रोज वाढत आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या खात्याला भरपूर अनुभवी व्यक्तींची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सरकारने आता तरी याचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.