Thu, Jun 27, 2019 12:21होमपेज › Pune › धूम्रवलयात तरुणी शोधताहेत ‘स्टेटस’

धूम्रवलयात तरुणी शोधताहेत ‘स्टेटस’

Published On: May 31 2018 1:45AM | Last Updated: May 30 2018 11:41PMपुणे : टीम ‘पुढारी’

व्यसनाधीनता ही सध्याच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनातील गंभीर आजारच समजला जात आहे. साधारणपणे व्यसनांकडे पुरुषांचा कल अधिक असतो, मात्र व्यसनमुक्ती केंद्र आणि मानसोपचार तज्ज्ञांकडे वाढत असणारी मुलींची आणि महिलांची संख्या चिंतेचा विषय बनली आहे.

तंबाखू खाणे, ओढणे आणि पिणे आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे वारंवार सांगितले जाते. जागतिक पातळीवरही तंबाखू विरोधात जनजागृती मोहीम राबविली जाते; तरीही या ‘विषाची परीक्षा’ घेण्यापासून माणूस मागे हटताना दिसत नाही.

मुलांमध्ये तंबाखू खाणे किंवा सिगारेट ओढणे हे प्रकार ‘कॉमन’ समजले जाते; मात्र आज मुलींमध्येही सिगारेट, हुक्का ओढण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेले दिसते आहे.अनेक मल्टिनॅशनल कंपन्या, हॉटेलबाहेर अशा अनेक ठिकाणी मुली बिनधास्तपणे सिगारेटचे झुरके घेताना दिसतात. सुशिक्षित मुलांप्रमाणेच शहरी, सुशिक्षित मुलींचे व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढणे हे एकूणच सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हानीकारक ठरत आहे. 

बदलती जीवनशैली, वाढलेले ताणतणाव, नात्यांचे बदललेले स्वरूप, कमी वयात हाती खुळखुळणारा पैसा, अशा अनेक गोष्टी मुलांप्रमाणेच मुलींमधील व्यसनवाढीला कारणीभूत समजल्या जातात. शहरी भागातील मुली सर्रास सिगारेट ओढणे, हुक्का पार्लरला जाणे, ई- सिगारेट ओढणे, हे स्टेटसचे लक्षण समजत आहेत. त्यांना यात काहीही गैर वाटत नाही, हाच सध्याचा काळजीचा विषय आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली मुली व्यसनांना जवळ करत असतील तर ते केवळ त्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक नाही तर सामाजिक स्वास्थ्यावरही ही व्यसनाधीनता परिणाम करणारी ठरण्याची भीती नाकारता येत नाही. 

ग्रामीण भागातील महिला पुर्वापार मिश्री लावणे, तंबाखू खाणे असे व्यसन करायच्या; मात्र त्यांना त्याचे दुष्परिणाम तितक्या तीव्रतेने माहीत नव्हते. त्यांच्या अशिक्षितपणामुळे त्यांना सांगूनही त्यापासून सुटका करून घेणे शक्य होत नव्हते. मात्र, आजच्या इंटरनेटच्या जमान्यात एका क्‍लिकवर कोणत्याही गोष्टीचे फायदे- तोटे समजत असतानाही, मुली याकडे आकर्षित होताना दिसत आहेत. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातही आज येणार्‍या मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे सध्या तरी तरुणीही बिनधास्त ‘दम मारो दम’ म्हणत  झुरका घेतानाचे चित्र सर्वसामान्य होत आहे. 

तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांचे व्यसन असणे, हे आपल्या समाजामध्ये क्षुल्लक व्यसन समजले जाते. कारण त्याचे दुष्परिणाम लगेच दिसत नाहीत. त्यामुळे त्याचा स्वीकार सध्या सगळीकडे मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. यात मुलींचाही समावेश वाढला आहे. हुक्का ओढणे हे सुरक्षित व्यसन समजले जाते. मात्र, ते शरीरासाठी तेवढेच घातक आहे. मुलींमधील व्यसनांचे प्रमाण वाढणे हे जास्त चिंताजनक आहे, कारण मुलींच्या  मातृत्वावर त्याचा परिणाम होऊ शकतो. व्यसनांमुळे त्यांच्या गर्भावर विपरित परिणाम होण्याची मोठी शक्यता असते.   - मुक्ता पुणतांबेकर, मुक्तांगण  व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका