Fri, Nov 16, 2018 09:11होमपेज › Pune › अभिनेत्रीचे काम देण्याचे आमिष दाखवले; पोलिस ठाण्यात तरुणावर गुन्हा

मॉडेलला १६ लाखाला गंडा

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:18AMपुणे : प्रतिनिधी

चित्रपटात अभिनेत्रीचे काम देण्याच्या आणि पुण्यात शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास एक वर्षात जादा परतावा देण्याच्या आमिषाने पुण्यातील मॉडेलला 16 लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकावर सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तुषार मधुकर देशमुख (वय 21, रा. शिवाजी चौक, बदलापूर, ठाणे) असे या भामट्याचे नाव आहे. याबाबत 31 वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या काही वर्षांपूर्वी मॉडेल म्हणून काम करत होत्या. नोव्हेंबर 2017 मध्ये डेक्कन भागातील एका सेमीनारसाठी फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी तुषार देशमुख याच्यासोबत त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्याने फिर्यादीशी ओळख वाढवली. तसेच, आपण पुण्यातले आहोत. तसेच मी मुंबई येथे असतो. तुम्हाला चित्रपटात काम मिळवून देऊ शकतो, असे सांगत त्यांचा विश्‍वास संपादन केला. परंतु, त्यासाठी पैसे लागतील असे सांगितले.  त्यावेळक्ष फिर्यादींनी त्याला आधी स्क्रीप्ट पाहण्यास मागितली. त्यासाठी त्याने ठाण्यात बोलवून घेतले. फिर्यादी तेथे गेल्याही; परंतु, तेथे कोणीच नव्हते. त्यावेळी त्याने चित्रपटाचे डायरेक्टर व इतर कामामुळे अचानक त्याचे येणे रद्द झाल्याचे सांगितले. 

त्यानंतर फिर्यादींना शेअर मार्केटचा व्यावसाय आहे. त्यात पैसे गुंतविल्यास चांगला फायदा होईल, असे सांगितले. तसेच, काही दिवसांनी पुण्यातही शेअर मार्केटचे ऑफिस सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार, त्यांना 15 लाख रुपये गुंतविल्यास एका वर्षात 18 लाख रुपये देतो, असे अमिष दाखवले.  फिर्यादींनी 15 लाख 70 हजार रुपये गुंतविले. परंतु, काही महिन्यांनी तुषार देशमुख याच्याबाबत बाहेरून फिर्यादींच्या नातेवाईकांना माहिती मिळाली. त्याबाबत सखोल तपास केला असता तो फसवत असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, देशमुखवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक के.बी. जाधव करीत आहेत.