Thu, Apr 25, 2019 22:11होमपेज › Pune › अभिनेत्री लीला गांधी यांना ‘जीवनगौरव’

अभिनेत्री लीला गांधी यांना ‘जीवनगौरव’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा व लोकरंग सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सात तारखेला या संमेलनाचे उद्घाटन होणार असून दोन दिवस हे संमेलन चालणार आहे. यावेळी लोककलेत निपुण व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. यंदा अभिनेत्री लीला गांधी व लेखक प्रभाकर मांडे यांना अनुक्रमे जीवनगौरव व कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलनाचे स्वागताध्यक्ष भाउसाहेब भोईर यांनी दिली. 

अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन हे सात व आठ एप्रिलला चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. त्यावेळी आयोजित पुरस्कार सोहळयाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी पिंपरीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाचे मुख्य निमंत्रक आमदार लक्ष्मण जगताप, स्वागत समितीचे अध्यक्ष-महापौर नितीन काळजे. सहशहर अभियंता प्रवीण तुपे आदी उपस्थित होते. उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी जीवन गौरव व कलागौरव पुरस्कार देण्यात येणार असून उर्वरित पुरस्कार हे समारोपाच्या दिवशी देण्यात येणार आहे.  

औद्योगिकनगरीत सांस्कृतिक चळवळ अधिक वृध्दिंगत व्हावी या हेतूने हे संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी यावेळी दिली. या संमेलनाच्या निमित्ताने जे खर्‍या अर्थाने लोककला जगले त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सर्वांशी सल्लामसलत करुन कार्यक्रमाची रुपरेषा ठरवण्यात येणार असून लवकरच त्याबद्दल माहिती देणार असल्याचे भोईर यांनी यावेळी सांगितले. 

संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्रातील लोककलावंतांनी संस्कृती जतन करण्याबरोबच त्यांचे सांस्कृतिक अभिसरण घडावे, यासाठी हा प्रयत्न आहे. तसेच लोककला परंपरा व कलामहर्षींचा गौरव करण्यात यावा व मराठी संस्कृतीचे स्मार्टसिटीतील नागरिकांना दर्शन घडावे, यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. 
नाट्य परिषदेची रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरु आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या शहराची सांस्कृतिक ओळख वृध्दींगत करण्यासाठी हे संमेलन आयोजित केले आहे. या उपक्रमासाठी पिंपरी महापालिकेने  सहकार्य केले आहे, अशी माहिती भाऊसाहेब भोईर यांनी दिली.

सन्मानाचे मानकरी

जीवनगौरव’ पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री आणि लोककलावंत लीला गांधी यांना देण्यात येणार आहे. पंचवीस हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. लेखक प्रभाकर मांडे यांना ’कलागौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अकरा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी वसंत अवसरीकर (सोंगाड्या), संजीवनी मुळे-नगरकर (लोकनाट्य), बापूराव भोसले (गोंधळी), सोपान खुडे (साहित्य गौरव), पुरुषोत्तम महाराज पाटील (कीर्तन), मुरलीधर सुपेकर (शाहीर), प्रतिक लोखंडे (युवा शाहीर) आदींचा सत्कार करण्यात येणार आहे. 2100 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

Tags : Pimpri, Pimpri news,  Leela Gandhi,  Lifetime Achievement award,


  •