होमपेज › Pune › अभिनेता आमिर खानने घेतली शरद पवारांची भेट

आमिर खानने घेतली शरद पवारांची भेट

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 19 2018 1:35AMपुणे : प्रतिनिधी

भारतीय चित्रपट क्षेत्रात मिस्टर परफेक्शनीस्ट म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिर खान आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व शरद पवार यांच्या भेटीचा योग नुकताच पुण्यात घडून आला. पाणी फाउंडेशन या अभियानावर चर्चा करण्यासाठी अमिर खान यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मोदी बागेतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान उद्योजक विठ्ठल मणीयार, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ यांच्यासह मोजक्या व्यक्ती उपस्थित होत्या. याबाबत, अधिकृत माहिती शरद पवार यांनी फेसबुक पेजवर जाहीर केली आहे.

शरद पवार या पोस्टमध्ये म्हणतात, केवळ पिण्यासाठी पाणी संवर्धन नाही तर 60 टक्के शेतीवर अवलंबून असलेल्या देशात शेतीसाठी पाण्याचा योग्य प्रकारे वापर करण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. याबाबत इस्राईलचे उदाहरण समोर ठेवायला हवे. पाण्याच्या अत्यल्प उपलब्धतेतही त्यांनी थेंब-थेंब वाचवून शेतीचे नंदनवन फुलवले आहे. आपल्या अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक कसे घेता येईल, यासाठी अनेक प्रयोग केले जातात.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्येही भरपूर पाणी लागणार्‍या उसाबाबत प्रयोग केले आहेत. पाटातून सोडण्यात आलेले पाणी बरेचसे वाया जाते. शिवाय, त्यामुळे बिनकामाचे तणसुद्धा माजतात. त्याऐवजी उसाच्या केवळ मुळांना मुबलक पाणी उपलब्ध होईल, अशी योजना केल्यास फायदेशीर ठरते. मी अमिर खान आणि त्यांच्या ‘टीम’ला अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यावेळी मी स्वतः उपस्थित राहून त्यांना इथले काम दाखवेन, असेही ते म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले, पाणी फाउंडेशनच्या कार्यातील लोकसहभाग वाखाणण्याजोगा आहे. अमिर खान यांना मी सुचवले आहे की, रयत शिक्षण संस्थेसारख्या असंख्य शैक्षणिक संस्था आपल्या राज्यात आहेत. तिथल्या विद्यार्थ्यांचा या कार्यात सहभाग करून घ्यावा. जेणेकरून त्यांना पाणी संवर्धनाबाबत रुची निर्माण होईल. तसेच त्यांचे याबाबत शिक्षणसुद्धा होईल. यापूर्वीही पाणी फाउंडेशनच्या या कामासाठी मी माझ्या खासदार निधीतून तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून काही आर्थिक मदत केली आहे. यापुढेही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ती करायची माझी तयारी आहे. पाणी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना या पाणी संवर्धनाच्या या कामासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अभिनेता अमिर खान यांनी राज्यात सुरू केलेले पाणलोटाचे कार्य आज एक सर्वसामान्यांची चळवळ बनले आहे. आपल्या देशात ऋतुमान अनियमित असल्याने पाणी साठवण्याची योजना राबवणे अत्यावश्यक आहे. सर्वसामान्यांचा सहभाग घेऊन त्यांना पाणी संवर्धनाच्या कामासाठी उद्युक्त करण्याचे कौतुकास्पद काम अमिर खान यांची टीम करत आहे. - शरद पवार, माजी केद्रीयकृषिमंत्री.