होमपेज › Pune › अभियोग्यता चाचणीत गुण वाढवणारे ‘रॅकेट’सक्रिय

अभियोग्यता चाचणीत गुण वाढवणारे ‘रॅकेट’सक्रिय

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 23 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यात शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी अभियोग्यता आणि बुध्दीमापन चाचणी पार पडली आहे. या चाचणीतील गुणांच्या आधारेच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया पार पडणार आहे.परंतु या चाचणीचे गुण वाढवून देणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. या रॅकेटकडून निम्मे पैसे सुरुवातीला द्या आणि उर्वरित गुण वाढल्यानंतर द्या, असे अमिषच विद्यार्थ्यांना देण्यात येत असून याची ऑडीओक्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.त्यामुळे राज्यात यंदा होणारी शिक्षक भरती संशयाच्या भोवर्‍यात सापडली असून अभियोग्यता चाचणी आणि पवित्र पोर्टलच्या पारदर्शकतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 

राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यासाठी गेल्या वर्षी 12 ते 21 डिसेंबर दरम्यान अभियोग्यता आणि बुध्दीमापन चाचणी झाली. या परीक्षेसाठी तब्बल 1 लाख 97 हजार 520 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1 लाख 71 हजार 348 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षार्थ्यांना त्यांचा निकाल परीक्षा झाल्यावर समजला होता. त्यानंतर राज्य सरकारने या परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जानेवारी महिन्यात जाहीर केला. मात्र, या निकालात आणि परीक्षा झाल्यावर दाखविलेल्या गुणांमध्ये 1 ते 30 गुणांपर्यत तफावत होती. याबाबतचे आक्षेप देखील विद्यार्थ्यांनी नोंदविले होते. ही परिस्थिती असतानाच अद्याप निकालाच्या हार्डकॉपी परीक्षार्थ्यांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे निकालाच्या पारदर्शकतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्यातच या चाचणीत मिळालेल्या गुणांमध्ये वाढ करून देणारी टोळी सक्रीय झाली असून या टोळीला शिक्षण विभागातील अनेक अधिकार्‍यांचा छुपा पाठिंबा असल्याचे ऑडीओ क्लिपमधील संभाषणावरून स्पष्ट होत आहे. टोळीच्या सदस्याची गुण वाढवून देण्याबाबतची एक ऑडिओ क्लिप अभियोग्यता चाचणी दिलेल्या परीक्षार्थ्यांमध्ये व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये दोन व्यक्तींचे संभाषण आहे. संभाषणात एका परीक्षार्थ्याने गुण वाढविण्यासाठी पैसे दिले असून तो दुसर्‍या परीक्षार्थ्याला चाचणीमध्ये गुण वाढवून देण्याची प्रक्रिया समजावून सांगत आहे. यामध्ये सात लाख रुपये गुण वाढीचे काम करण्यासाठी आणि गुण वाढल्यानंतर सात लाख रुपये देण्याचे संभाषण आहे.

दरम्यान, गुण वाढतात याबाबत विश्‍वास निर्माण करण्यासाठी 2010 मध्ये शिक्षक भरतीसाठी झालेल्या सीईटीत देखील असाच प्रकार झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या संभाषणामुळे परीक्षार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असून निकालाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.