Wed, Apr 24, 2019 08:07होमपेज › Pune › शिक्षणातील ‘राम-श्याम’वर होणार कारवाई

शिक्षणातील ‘राम-श्याम’वर होणार कारवाई

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 12:39AM

बुकमार्क करा

पुणे : गणेश खळदकर 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने मान्यता दिलेल्या शासनमान्य कै. श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या खासगी अनुदानित शाळेत लिपिक म्हणून एका भावाची नियुक्ती झालेली असताना त्याच्या जागेवर त्याचाच सख्खा भाऊ काम करत आहे. तसेच ज्या भावाची त्या जागेवर प्रत्यक्ष नियुक्ती झाली आहे तो मात्र पुणे महानगरपालिकेच्या एका शाळेत रोजंदारी सेवकपदी कार्यरत असल्याची धक्कादायक बाब दैनिक ‘पुढारी’ने उघडकीस आणली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकार्‍यांनी या प्रकरणाची प्रत्यक्ष चौकशी केली आहे. या चौकशीत हे दोघे दोषी आढळले असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.

शहरातील एका संस्थेकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे लिपिक पदासाठी महेंद्र नामदेव बामगुडे यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार हा प्रस्ताव मंजूर करीत या पदावर सन 2004 मध्ये महेंद्र नामदेव बामगुडे यांची नियुक्ती करण्यात आली. कै. श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेच्या हजेरी पुस्तिकेत शाळेचा मान्य लिपिक म्हणून महेंद्रचे नाव असूनही प्रत्यक्षात त्याच्या जागेवर काम करतो, सह्या करतो आणि पगार घेतो तो त्याचा भाऊ रवींद्र नामदेव बामगुडे. महेंद्र हा तापकीर शाळेमध्ये लिपिक म्हणून काम करणे अपेक्षित असताना तो मात्र पुणे महापालिकेच्या कै. संजय महादेव निम्हण शाळा क्र.31 बी या शाळेत काम करीत आहे. तापकीर शाळेचेच शिक्षक नवनाथ दामोदर गारगोटे यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली असता 2015 मध्ये जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती नेमण्यात आली. मात्र या चौकशी समितीसमोर दोघेही भाऊ हजर झाले नसल्यामुळे त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.मात्र दैनिक ‘पुढारी’ने नोव्हेंबर महिन्यात शिक्षण खात्यातील ‘राम-श्याम’चा बनाव हे वृत्त प्रकाशित करून  या राम आणि श्यामचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकार्‍यांनी संबंधित शाळेस भेट दिली. त्या वेळी संबंधित लिपिक रवींद्र बामगुडे शाळेत उपस्थितच नसल्याचे दिसून आले होते.