Mon, Apr 22, 2019 12:09होमपेज › Pune › विनापरवाना कार्यालय सोडल्यास अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाई

विनापरवाना कार्यालय सोडल्यास अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाई

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 18 2018 12:59AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय, क्षेत्रीय व विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयात नसतात. वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता कार्यालय सोडत असल्याने अनेक कामे अडून पडतात. अशा अधिकारी व कर्मचार्‍यांवर शिस्तभंग व जबर दंडाची कारवाई करण्याचा सक्त सूचना  आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत. त्याविषयीचे परिपत्रक मंगळवारी (दि.17) प्रसिद्ध करण्यात आले आहे.

कार्यालयात गैरहजर राहण्यासाठी, दौर्‍यावर किंवा परदेश दौर्‍यासाठी जाण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे; मात्र अनेक अधिकारी व कर्मचारी त्याचे पालन करीत नाहीत. कार्यालयीन वेळेत अनेक अधिक व कर्मचारी कार्यालयाबाहेर असतात. त्या वेळेत ते स्वत:ची वैयक्तिक कामे करीत असतात. लग्न समारंभ आणि कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्याचबरोबर शहरात दौरे आणि परदेश दौरे व सहली करतात. पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी व नगरसेवकांनी बोलाविलेल्या बैठकांना सबळ कारणाशिवाय गैरहजर राहतात. त्यामुळे कामे खोळंबून राहतात. त्या संदर्भात पदाधिकारी व नगरसेवकांनी अनेकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

याचप्रकारे कामात हलगर्जीपणा केल्यामुळे आणि बैठकीस उपस्थित न राहिल्याबद्दल  दोन उपअभियंत्यांवर सेवानिलंबनाची कारवाई 25 जूनला करण्यात आली. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभागातील उपअभियंता किशोर महाराज व स्थापत्य विभागाचे उपअभियंता विजयकुमार काळे असे त्यांचे नाव आहे. पूर्वपरवानगी न घेता गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी प्रशासनामार्फत फिरतीविषयी रजिस्टरमध्ये नोंद करण्याची सक्ती केली होती. तरीही अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये सुधारणा झालेली नाही. यापुढे वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता कार्यालय सोडल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे; तसेच, जबर दंडाची (शास्ती) कारवाईही केली जाईल, याविषयीचे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.