Fri, Feb 22, 2019 19:49होमपेज › Pune › सहा महिन्यांत 135 होर्डिंग्जवर कारवाई

सहा महिन्यांत 135 होर्डिंग्जवर कारवाई

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 12:19AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत जाहिरात होर्डिग्जचे पेव फुटले आहे. या माध्यमातून जाहिरातीचे दरमहा लाखो रूपये उत्पन्न मिळत असल्याने खासगी व सरकारी व सार्वजनिक जागेत होर्डिग्ज लावले जात आहे. असा अनधिकृत होर्डिग्जवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने धडक कारवाई करीत, गेल्या 6 महिन्यांमध्ये तब्बल 135 होर्डिग्ज तोडून ते जप्त करण्यात आलेे. 
शहरातील खासगी इमारती, जागा, टेरेस तसेच, सरकारी व सार्वजनिक जागेवर असे अनधिकृत जाहिरात होर्डिग्ज उभे आहेत. वर्दळीचे चौक आणि रस्त्यावर तर या होर्डिग्जची संख्या सर्वांधिक आहे. जून महिन्यात झालेल्या वादळी वार्‍यासह पावसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी लोखंडी होर्डिग्ज पडून दोन नागरिकांचा हकनाक बळी गेला होता. त्यामुळे अनधिकृत होर्डिग्जचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला होता. या संदर्भात ‘पुढारी’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून शहरातील अनधिकृत होर्डिग्जचा प्रकरण लावून धरले होते. त्याची प्रशासनाने दखल घेतली. 

दरम्यान, स्थायी समितीने दिलेल्या सक्त सूचनामुळे आकाशचिन्ह विभागाने जानेवारीपासून शहरातील अनधिकृत जाहिरात होर्डिग्जवर कारवाई सुरू केली. आतापर्यंत एकूण 135 अनधिकृत होर्डिग्जवर कारवाई करून संबंधित लोखंडी सांगडे जप्त करण्यात आले आहेत. तसेच, अनेकांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. तसेच, काही जणांवर पोलिसांत गुन्हेही दाखल केले आहेत. ही कारवाई या पुढेही सुरूच राहणार आहे. अनधिकृत होर्डिग्जधारकांनी पालिकेकडे अर्ज करून रिसतर होर्डिग्जची मान्यता द्यावी. अन्यथा अनधिकृत होर्डिग्ज तोडले जातील. तसेच, पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्याचा इशारा आकाशचिन्ह परवाना विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे यांनी सांगितले. सदर कारवाई पालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जात आहे.