Sat, Jan 19, 2019 16:12होमपेज › Pune › ‘बीआरटी’त 5 घुसखोर वाहने जप्‍त

‘बीआरटी’त 5 घुसखोर वाहने जप्‍त

Published On: Jan 07 2018 2:10AM | Last Updated: Jan 07 2018 2:08AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

पीएमपीच्या येरवडा ते वाघोली या बीआरटी मार्गावर घुसखोरी करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्याचे काम सुरू झाले असून, पाच जानेवारीपर्यंत सुमारे 25 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये  20 दुचाकी, पाच चारचाकी वाहने आहेत. कारवाई केलेल्या वाहनांमध्ये  दोन शासकीय वाहनांचा समावेश  आहे. त्यापैकी पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत. 

सोमवारपासून अशा घुसखोर वाहनांवर अधिक जोमाने कारवाई करण्यात येणार असून, संबंधित वाहने जप्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत माहिती देताना मुंढे म्हणाले, ‘बीआरटी मार्गातून घुसखोरी करणार्‍या वाहनांवर आता सोमवारपासून अधिक जोमाने कारवाई करून, ती जप्त करून वाहनचालकांवर फौजदारी कारवाई करण्यात  येणार आहे. त्यानंतर जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.

शहरातील प्रवाशांना जलद, सुलभ आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक बससेवा उपलब्ध करण्याच्या हेतूने बारआरटी मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली. मात्र, या मार्गाचा गैरवापर होताना दिसत आहे.

रुग्णवाहिका सोडून इतर खासगी वाहनांना प्रवेश करण्यास परवानगी नाही. खासगी वाहने बीआरटी मार्गातून जाऊ  नयेत यासाठी बीआरटी मार्गावर पीएमपीच्या वतीने वॉर्डन नियुक्त करण्यात आले  आहेत. मात्र कित्येक वाहनचालक वॉर्डनला धक्काबुक्की; तसेच शिवीगाळ; प्रसंगी मारहाण करून नियमबाह्यपणे मार्गातून वाहने चालवीत असल्याचे प्रकार घडत आहेत.  

काही मार्गावर वॉर्डनला गंभीर दुखापतीसुध्दा झालेल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक  मुंढे यांनी बीआरटी मार्गातून घुसखोरी करणार्‍या खासगी वाहनांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार येरवडा ते वाघोली या बीआरटी या मार्गावर पाच जानेवारीपर्यंत  पीएमपीचा सुरक्षा विभाग, वाहतूक पोलिस यांनी संयुक्तपणे सलग काही दिवस-रात्री 8 ते पावणेदहापर्यंत कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली.  दरम्यान दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या वाहनांमध्ये दोन शासकीय वाहनांचा समावेश आहे; तर 25 वाहनांपैकी पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत.