Fri, Apr 26, 2019 17:47होमपेज › Pune › पुणे : मांजरीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पुणे : मांजरीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Published On: May 03 2018 4:56PM | Last Updated: May 03 2018 4:55PMपुणे : प्रतिनिधी 

हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक येथील अनधिकृत बांधकामावर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)ने कारवाई केली. यात सर्व्‍हे नंबर १४१ मधील ११५४.४० चौ.मी. क्षेत्रावरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्‍त करण्यात आले. 

महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३ (१) अन्वये संबधिताना प्रत्येकी दोनदा नोटीसा देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकामे सुरु ठेवली होती. सदरच्या बांधकामाचे क्षेत्रफळ हे एकूण ११५४.४० चौरस मीटर आरसीसी स्वरुपात चार मजली होते. या अनधिकृत बांधकामाचा निवासी व  व्यावसायिक जागेसाठी वापर केला जात होता. सदरच्या अनधिकृत जागेत एक दुकान व १२ फ्लॅट होते. सदरची अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निष्कासन पथक क्रमांक एक मार्फत होत आहे. 

अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाईवेळी पीएमआरडीएचे पोलिस निरीक्षक राजकुमार शेरे, (प्रभारी तहसीलदार) उपअभियंता राजेंद्र मेदनकर, उपअभियंता सुर्यकांत कापसे, सह्यक अभियंता राजेश्वर मंडगे, तसेच हडपसर पोलीस स्टेशनचे स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या बंदोबस्ताच्या नियंत्रणाखाली सदरील कारवाई पार पाडण्यात आली. 

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी नागरिकांनी सदर सदनिका खरेदी करताना सावधगिरी बाळगावी. अनधिकृत सदनिका खोटी माहिती देऊन स्वस्त दराचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जाते. नागरिकांचे आर्थिक नुकसान टळावे याकरिता नागरिकांनी जागरूक राहावे.  नागरिकांनी शहानिशा करूनच सदनिका खरेदी कराव्यात, असे आवाहन महानगर आयुक्तांनी केले आहे.