Wed, Jul 17, 2019 10:31होमपेज › Pune › संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोक्का’चा बडगा

संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोक्का’चा बडगा

Published On: Mar 01 2018 1:53AM | Last Updated: Mar 01 2018 1:30AMपुणे : पुष्कराज दांडेकर

मुंबईतील संघटितरित्या गुन्हेगारी करणार्‍या टोळ्यांचा उच्छाद मोडीत काढण्यासाठी एन्काउंटरचे अस्त्र म्यान केल्यानंतर राज्यात या टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्या (मोक्का)च्या अस्त्राचा प्रभावी वापर राज्यात करण्यात येत आहे.  मागील पाच वषार्ंत याच कायद्यानुसार पुणे पोलिसांनी  कारवाई करत शहरातील लहान मोठ्या 57 टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

पुणे शहर, एक मेट्रोपोलिटन शहर म्हणून उदयास आले. शहराचा विस्तार वाढला तसा औद्योगिक वसाहती वाढल्या. शहराच्या आजूबाजूला असलेल्या तालुक्यांपर्यंत शहराचा विस्तार वाढला. मोठमोठे बांधकाम प्रकल्पासाठी जमिनीचे व्यवहार, त्यातून  या परिसरांना जमिनी मालकांना सुगीचे दिवस आले. मात्र जमिनीसाठी लोकांना धमकावणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, खून करणे यासोबतच व्यावसायिंकांकडून खंडणी उकळणे असे उद्योग सुरू झाले.

मागील काही वषार्ंत या टोळ्यांच्या वर्चस्व वादातून अनेक खूनही पडले आहेत. अशा टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुण्याचे तत्कालीन सहपोलिस आयुक्त सुनील रामानंद यांनी कायद्याचा अभ्यास करून प्रभावी वापर केला. त्यानंतर शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण मिळवले.  मात्र शहरात नवीन वेगवेगळ्या प्रकारे संघटित गुन्हेगारी करणार्‍या टोळ्या उदयाला आल्या. या टोळ्यांचे वर्चस्व आटोक्यात आणण्यासाठी मोक्का लावून टोळ्यांच्या म्होरक्यांना कारागृहात टाकण्यात आले.

मात्र, जवळपास तीन वर्षांपर्यंत त्यांचा जामीन न झाल्याने त्यांची बाहेरील ताकद कमी झाली. तरीही गुन्हेगारी नवनवीन टोळ्या उदयास येत आहेत. त्यांच्यावरही मोक्काची कारवाई प्रस्तावित आहे. मुंबईतील संघटित गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी एन्काउंटरच्या हत्याराचा वापर करण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारने ‘टाडा’ कायद्याच्या धर्तीवर 1999 साली मोक्का कायदा तयार केला. मुंबई व इतर शहरातील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘मोक्का’चा आधार घेत अनेक गुंडाना पोलिसांनी तुरुंगात पाठविले. ‘मोक्का’ मध्ये लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वषार्ंनुवर्षे तुरुंगात खितपत पडले. त्यांची नंतर सुटका झाली तरी त्यांची  टोळी मोडकळीस आली.  तरीही नव्या टोळ्या सद्य:स्थितीत उदयाला येत आहेत. 

मोक्का कारवाई केलेल्या टोळ्या  

गज्या मारणे, गणेश मारणे, शरद मोहोळ, निलेश घायवळ, बापू नायर   सेक्स रॅकेट चालविणार्‍या कल्याणी देशपांडे हिच्यावर पिटांतर्गत दाखल गुन्ह्यात वेळोवेळी कारवाई करण्यात आली. त्यानंतर तिला 2016 मध्ये अटक करून तिच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली.  2017 मध्ये व्हॉट्सअपचा वापर करून विदेशातून मुली आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणार्‍या टोळीतील 23 जणांवर पोलिसांनी नुकतीच मोक्काची कारवाई केली.   निलेश घायवळ याने सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळवला, परंतु जामिनावर असताना पुण्यातील एका नगरसेवकाला खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला अटक करून पुन्हा त्याच्यावर मोक्का लावण्यात आला.  

लुभ्या चांदिलकर टोळी,  पुण्यातील एका व्यावसायिकांचे अपहरण करून खंडणी उकळल्याप्रकरणी व पोलिसांशी संगनमत करून, पुणे ग्रामीण पोलिसांनी पौड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्काची कारवाई केल्यानंतर लुभ्या जेल पार्टी पोलिसांच्या तावडीतून पसार झाला होता.   पिंपरी येथील नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाचा कट त्याने अ‍ॅड. सुशील मंचरकर याच्यासोबत रचला होता. त्याच्यावर तीन वेळा मोक्काची कारवाई करण्यात आली.   बापू नायर याच्या पत्नी आणि आईला पळून जाण्यास मदत करत न्यायालयाची दिशाभूल करणार्‍या अ‍ॅड. वर्षा फडके हिच्यावरही मोक्काची कारवाई करण्यात आली.