Fri, Apr 26, 2019 09:44होमपेज › Pune › पुरंदर विद्यापीठाचा बाजार उठणार 

पुरंदर विद्यापीठाचा बाजार उठणार 

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 12 2018 12:56AM

बुकमार्क करा
पुणे : गणेश खळदकर

बोगस पुरंदर विद्यापीठाचा दैनिक ‘पुढारी’ने पर्दाफाश करून सतत पाठपुरावा केल्यानंतर उच्चशिक्षण विभागाला अखेर जाग आली असून, संचालक डॉ. धनराज माने यांनी आरटीआय कार्यकर्ते डॉ.अभिषेक हरिदास यांच्या निवेदनाच्या आधारे या विद्यापीठावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कारवाई पोलिस प्रशासनाने करायची की उच्च शिक्षण विभागाने, हा वाद संपला आहे. उच्च शिक्षण विभागामार्फतच या विद्यापीठावर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा तर्‍हेने पुरंदर विद्यापीठाचा बाजार उठणार आहे. चक्क विद्यापीठच बोगस पध्दतीने काढून नियमबाह्य पदव्यांची खैरात करणारे पुरंदर विद्यापीठ बोगस असल्याचे दैनिक ‘पुढारी’ने उघडकीस आणले होते. 

त्यानंतर या विद्यापीठावर पोलिस प्रशासनाने कारवाई करायची की उच्च शिक्षण विभागाने, यावरून वाद निर्माण झाला होता. या वादात एकीकडे कारवाई रखडलेली असताना पुरंदर विद्यापीठाचा सूत्रधार दादा जगताप याच्यावरील कारवाईबाबत मात्र प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. कारण पुरंदर विद्यापीठावर उच्च शिक्षण विभागानेच कारवाई करावी. आम्ही यातील तज्ज्ञ नाही, असे पोलिस प्रशासनाचे म्हणणे होते. तर तक्रारकर्ता उपलब्ध झाल्याशिवाय कारवाई करता येणार नसल्याचा पवित्रा उच्च शिक्षण विभागाने घेतला होता. अखेर गुरूवार दि.11 रोजी डॉ. धनराज माने यांनी पुरंदर विद्यापीठावर लवकरच कारवाई होणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच राज्य शासनाच्या 2013 विद्यापीठ कायद्यानुसार कोणताही अभ्यासक्रम चालविणे तसेच, विद्यापीठ उभारणीसाठी किमान दहा विविध परवानग्यांची आवश्यकता आहे. अशा परवानग्या ज्यांच्याकडे नाहीत, त्यांच्यावर देखील भविष्यात कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पुरंदर विद्यापीठाचा सूत्रधार दादा जगताप याने गेल्या बारा ते पंधरा वर्षांपासून बोगस पदव्यांचा बाजार मांडला असून मागेल त्याला हवी ती पदवी देण्याचा पराक्रम केला आहे. तसेच या माध्यमातून कोट्यवधींची माया गोळा केली असून मी केले त्यात काहीच चुकीचे नसल्याचे माध्यमांना उजळमाथ्याने सांगत आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यापांसून जगताप यांची कोणी साधी विचारणा देखील केली असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जगताप यांना नेमके अभय कोणाचे असा प्रश्‍न निर्माण झाला होता. परंतु डॉ. माने यांनी पुरंदर विद्यापीठावर कारवाईचे संकेत दिल्यामुळे आता जगताप यांच्यावर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डॉ. अभिषेक हरिदास यांच्या निवेदनाची उच्च शिक्षण विभागाने दखल घेतली आहे. 2013 च्या विद्यापीठ कायद्याचा अभ्यास करून नियमानुसार पुरंदर विद्यापीठावर  कारवाई करण्यात येणार आहे.  - डॉ. धनराज माने, संचालक, उच्च शिक्षण विभाग 

पुरंदर या बोगस विद्यापीठावर कारवाई करण्याचा उच्च शिक्षण विभागाचा निर्णय ऐकून आनंद झाला आहे. फक्त उच्च शिक्षण विभागाने कारवाईचा फार्स न करता या विद्यापीठावर कडक कारवाई करावी जेणेकरून इतर नियमबाह्य अभ्यासक्रम राबविणार्‍या संस्थाना वचक बसण्यास मदत होईल. नेमकी काय कारवाई होते हे बघणे जरूरीचे आहे.   - डॉ. अभिषेक हरीदास,आरटीआय कार्यकर्ते 

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. याच माहेरघरात पुरंदर विद्यापीठ बोगस पदव्या देत होते. याची तक्रार देवून सुध्दा कारवाई होत नव्हती. परंतु माध्यमे आणि सामाजिक संघटनांच्या रेट्यामुळेच उच्च शिक्षण विभागाला कारवाई करणे भाग पडले. आता उच्च शिक्षण विभागाने कठोर कारवाई करावी एवढीच अपेक्षा .    - विकास कुचेकर, अध्यक्ष, मानवी हक्क संरक्षण व जागृती