होमपेज › Pune › प्लॅस्टिक उत्पादकांवर कारवाईचा बडगा 

प्लॅस्टिक उत्पादकांवर कारवाईचा बडगा 

Published On: Jun 15 2018 1:24AM | Last Updated: Jun 15 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी

प्लॅस्टिक बंदी लागू केल्यानंतर प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी देण्यात आलेली मुदत येत्या 23 जूनला संपत आहे. त्यामुळे महापालिकेकडून धडक कारवाई सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात प्लॅस्टिक उत्पादकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.  

प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक आणि थर्मोकोलवर बंदी घातली आहे. गुढी पाडव्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, प्लॅस्टिक उत्पादक-विक्रेते यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाला स्थगिती न देता उपलब्ध प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. ही मुदत येत्या 23 जूनला संपुष्टात येत आहे. त्यामुळे ही मुदत संपल्यानंतर प्लॅस्टिक वापर करणार्‍यांवर आणि विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. याबाबत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक-थर्मोकोलचे उत्पादन करणार्‍यांवर प्रथम कारवाई केली जाणार आहे.  त्यानंतर प्लॅस्टिक वस्तूंचा साठा आणि विक्री करणार्‍या विक्रेत्यांवरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.