Thu, Aug 22, 2019 10:14होमपेज › Pune › चेन पुलिंग करणार्‍या १३ महिलांवर कारवाई

चेन पुलिंग करणार्‍या १३ महिलांवर कारवाई

Published On: Jul 10 2018 1:29AM | Last Updated: Jul 10 2018 1:29AMपुणे : प्रतिनिधी 

चेन पुलिंग करणार्‍या महिलांवर सोमवारी दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी दौंडहून सुटणारी 51350 दौंड-पुणे पॅसेंजर नियोजित वेळेत सुटली. मात्र घोरपडी यार्डात सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास गाडी आली असता काही महिलांनी चेन ओढत गाडी थांबवून धरली. घोरपडी येथे या गाडीला थांबा देण्यात यावा, अशी मागणी करत गाडीच्या पुढे थांबत सुमारे 20 मिनिटे गाडी रोखून ठेवण्यात आली.

त्या पाठोपाठ येणार्‍या 6 रेल्वेंना देखील सुमारे अर्धा तास उशीर झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. या प्रकरणी 13 महिलांना अटक करून त्यांना रेल्वे कोर्टात हजर करण्यात आले. त्यापैकी 12 महिलांकडून विविध कलमाअंतर्गत प्रत्येकी 400 रुपये दंड आकारण्यात आला. तर एका महिलेला 500 रुपये दंड केला गेला. 

चेन पुलिंग करत लोहमार्गावर येत उभे राहणे धोकादायक असून 2017-18 या वर्षी 26 लोकांचा लोहमार्ग ओलांडताना मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. रेल्वे ट्रॅकच्या 200 मीटर अंतरावर थांबणे अनधिकृत असून ते अत्यंत धोकादायक आहे. यामुळे महिलांवर कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.