Tue, Mar 26, 2019 23:56होमपेज › Pune › ‘पीएमआरडीए’चा हातोडा

‘पीएमआरडीए’चा हातोडा

Published On: May 18 2018 1:32AM | Last Updated: May 18 2018 12:34AMधायरी : सिंहगडरोड  परिसरातील न-हे गावात अनधिकृत  बांधकामावर पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या वतीने कारवाई करण्यात आली. या वेळी सर्व्हे नं 45/9 बँक ऑफ महाराष्ट्र समोरील पाच मजली इमारत जॅक कटरच्या मोठ्या मशिनच्या साह्याने भुईसपाट करण्यात आली.

नर्‍हे गावात प्रथमच पीएमआरडीएची एवढी मोठी कारवाई झाल्याने  अनधिकृत बांधकाम व्यावसायिकात घबराट निर्माण झाली आहे. या वेळी परिसरात तणावग्रस्त शांतता होती. प्रचंड मोठ्या प्रमाणात कारवाईच्या वेळी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. परिसरातील सर्व अनधिकृत इमारत बांधकामांच्या व्यवसायिकांना तीन वेळेस नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र मेदनकर यांनी दिली.

ही कारवाई पी.एम.आर.डी.ए चे आयुक्त किरण गित्ते , पोलिस अधीक्षक व नियंत्रक सारंग आव्हाड व अतिरिक्त जिल्हाधिकारी मिलिंद पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार राजेंद्र मेदनकर , शेरे, कापसे यांच्या पथकाने केलीही  कारवाई एक मशीन जॅक कटर, चाळीस कामगार, चाळीस पोलीस अधिकारी व कर्मचारी इत्यादींच्या सहाय्याने करण्यात आली.

कारवाई थांबविण्यासाठी निवेदन

कारवाईच्या वेळी येथील बांधकाम व्यवसायिक व नागरिकांनी आमच्या बांधकामांवर कारवाई करू नका आम्ही घर दुरुस्तीसाठी ग्रा. प. परवानगी घेऊन इमारत बांधत आहे. आपल्या सर्व नियमानुसार कायदेशीरपणे मान्यता घेऊन दंड भरण्याची आमची तयारी आहे. सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्णता करण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन लोकप्रतिनिधी यांच्या समवेत तहसीलदार राजेंद्र मेदनकर यांना देण्यात आले. या वेळी पुणे महानगरपालिका स्थायी समिती मा. सदस्य नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, पं. स. सदस्य ललिता कुटे, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे , मा. उपसरपंच राजाभाऊ वाडेकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.