होमपेज › Pune › प्रेमी युगलांचा बाजार उठला

प्रेमी युगलांचा बाजार उठला

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 23 2018 12:46AMपुणे : प्रसाद जगताप

नेहमीप्रमाणेच सायंकाळी सहाचा सुमार...,  मावळतीला झुकलेल्या सुर्यांची सोनेरी किरणे..., झेड ब्रीजवर बसून प्रेमाच्या दुनियेत वाहून जाण्यासाठी सज्ज झालेले प्रेमी युगल आणि प्रेमी युगल प्रेमाच्या दुनियेत बुडणार इतक्यात दहा-पंधरा वाहतूक पोलिसांनी झेड ब्रीजवर बसलेल्या प्रेमीयुगलांच्या दुचाकींवर धडक कारवाई करत त्यांचा बाजार उठवला.

डेक्कन वाहतूक पोलिसांकडून झेडब्रीजवर दुचाकी पार्क करून वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणार्‍या प्रेमी युगलांवर सोमवारी सायंकाळी धडक कारावाई करण्यात आली. आणि पुन्हा येथे बसू नका, असा सज्जड दमच त्यांनी भरला. तसेच त्यांच्याकडून पावत्या फाडून दंड वसूल करण्यात आला असल्याचे या परिसरातून जात असताना ‘पुढारी’च्या प्रतिनिधीला पाहायला मिळाले.

झेडब्रीजवरून जाताना सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. ती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. तसेच येथे बसलेल्या प्रेमीयुगलांकडून लायसन्सची मागणी करत अनेकांना दंड भरण्यास भाग पाडले. येथे बसलेले अनेक प्रेमीयुगल हे महाविद्यालयीन तरूण असल्यामुळे अनेकांकडे लायसन्स देखील नव्हते. या कारवाईमुळे दररोज गर्दीने भरगच्च असलेला झेडब्रीज काही मिनिटांतच रिकामा झाला. आणि या परिसरात सायंकाळी शुकशुकाट पहायला मिळाला.

नागरिकांच्या प्रतिक्रिया

झेड ब्रीजवर अनेक प्रेमी युगलांच्या दुचाकींवर वाहतूक पोलिस कारवाई करण्यात येत होती. तसेच त्यांना याठिकाणी पुन्हा बसू नका, असा सज्जड दम देखील दिला जात होता. याचवेळी येणार्‍या-जाणार्‍या पुणेकर नागरिकांनी सुध्दा ‘घरी जाऊन प्रेम करा’ असा प्रेमी युगलांना सज्जड दमच दिला.

कारवाई कायम राहणार

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जाण्यासाठी झेडब्रीजचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. पुलावर नो पार्कींग असतानाही काही दुचाकीस्वार नो पार्कींगच्या ठिकाणी वाहने पार्क करत असल्याचे आढळून आले होते, त्यानुसार डेक्कन वाहतूक पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशीच कारवाई कायम करण्यात येणार आहे. -सुभाष जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, डेक्कन