Sat, Nov 17, 2018 18:28होमपेज › Pune › आचार्य अत्रे रंगमंदिरात भूत?

आचार्य अत्रे रंगमंदिरात भूत?

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 12:50AMपिंपरी : प्रतिनिधी

नुकतीच अंधश्रद्धेमुळे एका प्रथितयश रुग्णालयात एका महिलेचा बळी गेल्याची घटना ताजी असताना पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिराचे कामही अंधश्रद्धेमुळेच रखडल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. एका अंधार्‍या कोपर्‍यात मजुरांना महिलेने हाक मारली असल्याचा भास होत असल्याचे कामगारांनी सांगितले असून, या भीतीपोटी मजूर काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू असलेले रंगमंदिराचे काम सध्या रखडत रखडतच सुरू आहे. 

पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिराचे काम सुरू असताना या ठिकाणी अचानक वारा सुटला आणि मारण्याचा आवाज येऊ लागला; तसेच लाकडाचा सांगाडा हलू लागला. काही कामगारांना भूतच दिसले. त्यामुळे सुरक्षा रक्षकांसह सर्व कामगारांनी येथून धूम ठोकल्याची माहिती कामगारांनी दिली. त्यानंतर तब्बल दहा दिवस अत्रे रंगमंदिराचे काम बंद होते. दहा दिवसांनंतर कामगारांकरवी हनुमान पाठ व पूजा घालण्यात आली. त्यानंतर पुन्हा काम सुरू करण्यात आल्याची माहिती कामगारांनी दिली.

व्यवस्थापनाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. काही दिवसांपूूर्वी येथे वयोवृद्ध कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाला असून, त्याचा आत्मा येथे भटकत असल्याच्या भीतीपोटी कामगारांनी हा धसका घेतला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 

कामगारांकरवी सांगण्यात येत असलेल्या हाकामारी प्रकरणात काहीही तथ्य नसून, ही केवळ अफवा असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे; तसेच संध्याकाळी पाचपर्यंतच येथे नूतनीकरणाचे काम चालते, त्यामुळे मजुरांना रात्री थांबण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. त्यामुळे हे प्रकार खोटे आहेत. कामगारांशी चर्चा केली असता काही दिवसांपूर्वी येथे व्यासपीठाजवळ एका कोपर्‍यात त्यांना एक महिला हाक मारत असल्याचा; तसेच तिच्या बांगड्यांचा आवाज येत असल्याचे सांगितले. 

अद्यापही काही जणांना या प्रकाराची भीती वाटत असल्याने मध्येच काम सोडून ते पळून जात असल्याची माहीती एका कामगाराने दिली. हे असेच प्रकार सुरू राहिले, तर कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या रंगमंदिरात भविष्यात रसिक प्रेक्षक येतील का, अशी भीती रंगकर्मींनी व्यक्त केली आहे. 

काही दिवसांपूर्वी एक वयोवृद्ध कामगार कामावर असताना मरण पावला. त्याचा धसका कामगारांनी घेतला असावा; परंतु या सर्व ऐकीव गोष्टी व अफवाच आहेत. येथे सर्व ठेकेदाराची माणसे असतात. रात्रीच्या वेळी दोन सुरक्षारक्षक असतात. त्यांना विचारले असता असा प्रकार घडला नसल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितले आहे. आजवर आम्हास असा प्रकार नजरेस पडला नाही. येथे पूजा घातल्याचे आम्ही प्रत्यक्ष बघितले नाही. आचार्य अत्रे रंगमंदिरातील कर्मचारी सध्या निळू फुले रंगमंदिरात काम करत आहेत. त्यामुळे या प्रकाराची कल्पना नाही.     - विजय घावटे, व्यवस्थापक, आचार्य अत्रे, रंगमंदिर