Mon, Jul 22, 2019 00:34होमपेज › Pune › द्रुतगतीवरील वेगमर्यादा वाढली; पण सुरक्षा साधनांचे काय? 

द्रुतगतीवरील वेगमर्यादा वाढली; पण सुरक्षा साधनांचे काय? 

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 12:00AMदेहूरोड :  उमेश ओव्हाळ

सुरूवातीपासूनच विविध कारणांमुळे सतत चर्चेत असलेला यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चर्चा आहे वेगमर्यादा वाढविल्याची. या निर्णयाचे काहीजणांकडून स्वागतही झाले. पण जीवापेक्षा आणखी मोलाचे काय ते? असे म्हणत बहुतांश वाहनचालकांकडून या निर्णयाबद्दल नाराजीच व्यक्त झाली. मार्गावर सुरक्षासाधनांची वाणवा  असताना घेण्यात आलेला हा निर्णय चुकीचा असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

देशातील द्रुतगती मार्ग, महामार्ग तसेच महापालिका हद्दीतील रस्त्यांवरील वाहनांची वेगमर्यादा वाढविण्याचा निर्णय केंद्रीय रस्ेत वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला. या निर्णयामुळे पुणे- मुंबई या दोन मोठ्या शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 4, कात्रज बायपास आणि यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग या प्रमुख रस्त्यांवरील वाहरतुकीचा वेग वाढणार आहे. या घोषणाचा सर्वाधिक प्रभाव द्रुतगती मार्गावर जाणवणार आहे. याचे कारण म्हणजे सुरूवातीपासूनच हा मार्ग विविध वादांमध्ये अडकलेला आहे.

सुरूवातीला या मार्गाचा जेवढा गाजावाजा झाला तेवढीच नंतर त्याची हवा निघुन गेली. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना मजबूत संरक्षक कुंपण हा अतिशय कुतूहलाचा विषय होता. मात्र, मार्ग सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच ग्रामीण भागात कुंपणाची पडझड झाली. त्याद्वारे वन्यपशू तसेच ग्रामीण भागातील पाळीव जनावरे रस्त्यावर येऊ लागली. पडक्या कुंपणामुळे तयार झालेल्या रस्त्याचा वापर पुढे ग्रामस्थांनीही सुरु केला. बिनधास्तपणे दुचाकी घेऊन नागरिक या रस्त्याने प्रवास करू लागले. शिळफाटा ते किवळे दरम्यान, रस्त्यावर येण्यासाठी केवळ पाच अधिकृत जोड असताना अनेक ठिकाणी अनधिकृत जोड तयार झाले. त्यावर एवढ्या वर्षात काहीच प्रभावी उपाय योजण्यात आले नाहीत. 

या मार्गावर टायर फुटण्याचे प्रकार तसेच काही ठिकाणी अतितिव्र वळणांवर वाहने उलटण्याचा धोका कायम आहे. याबाबत वाहतुक पोलीस आणि संबंधित यंत्रणेनेही वेळोवेळी सूचना जारी केल्या आहेत. तसे फलकही या मार्गावर लावण्यात आले आहेत. मात्र, बर्‍याचदा या सूचनांकडे वाहनचालकांकडून दुर्लक्ष केले जाते, आणि अपघात घडतात. हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार, परदेशातून मायदेशात परतणारे अनिवासी भारतीय, व्यापारी, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील नामवंतांचे या मार्गावर अपघाती बळी गेले. द्रुतगतीला  जवळपास दोन दशके पूर्ण होत आली आहेत. मात्र, या मार्गावरील दरडी कोसळण्याचा धोका आजही कायम आहे. विदेशी तंत्रज्ञांची मदत घेण्यात आली, संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या, पण सगळे प्रयत्न फोल ठरले. मार्गावर बसविण्यात आलेली इंटरकॉम दूरध्वनी यंत्रणा आता मलुल झाल्याचे चित्र आहे. रात्री अपरात्री वाहनचालकांना लुटण्याचे प्रकार सुरूच आहेत. अशा अडचणी कायम असताना व  त्यावर प्रभावी उपाय योजले नसतानाही  हा निर्णय घेण्यात आला आहे, असे जणकारांचे म्हणणे आहे. वेगमर्यादा वाढल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा विश्‍वास केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने दर्शविला आहे. हा विश्‍वास कितपत सार्थ ठरेल, हे आगामी काळच ठरवील.

Tags : Pimpri, Accelerated, acceleration, But, about, security, tools