Wed, Apr 24, 2019 19:47होमपेज › Pune › मांजरी बुद्रुक रेल्वे स्थानकातील कर्मचार्‍यांची मुजोरी 

तिकीट देत नाही.. काय करायचे करा

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:13AMपुणे: प्रतिनिधी 

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाअंतर्गत येणार्‍या पुुणे ते दौंड मार्गावरील मांजरी बुद्रुक रेल्वे स्थानकात दोन दिवसांपासून प्रवाशांना तिकीट दिले जात नाही; तसेच तिकीटे शिल्लक नाहीत, असे अजब उत्तर कर्मचार्‍यांकडून मिळते. मंगळवारी तिकिटाचा आग्रह धरणार्‍या एका प्रवाशाला तर ‘तिकीट देत नाही जा, काय करायचे ते कर’, असे उद्धट उत्तर ऐकावे लागले.  एवढेच नव्हेतर ‘तुम्ही यात पडू नका, अन्यथा  या प्रकरणात तुम्हालाच गोवले जाईल,’ अशी धमकी प्रवाशांना दिल्याची माहिती प्रवाशाने दै. पुढारीच्या प्रतिनिधीला दिली.

दरम्यान, तिकीट न देता प्रवाशांकडून घेतली जाणारी रक्कम वरकमाई म्हणून संबंधित कर्मचारी स्वत:च्या खिशात घालत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.  माजी ग्रामपंचायत सदस्या व प्रवासी रोहिणी धारवाडकर म्हणाल्या, ‘मांजरी स्थानकात तिकीट काढण्याकरिता आले असता तिकिटे संपल्याची माहिती मिळाली. मी शेतीच्या कामाकरिता मांजरी येथून दररोज केडगावला प्रवास करते.

पैसे देऊनही तिकीट दिले जात नसून जुन्याच तिकिटावर किंवा चक्क कागदावर कुठपर्यंतचे तिकीट काढले आहे, हे हाताने लिहून दिले जाते. आम्ही पैसे देतो,  तिकीट द्या असा आग्रह केल्यानंतरही  संबंधित कर्मचार्‍यांकडून अरेरावीची व अर्वाच्च भाषा वापरण्यात येते.’ या प्रकारामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने येथे तिकिटे त्वरीत उपलब्ध करावीत. तसेच मांजरी स्थानकातील मुजोर कर्मचार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

तिकिटे संपली असल्यास जुनी तिकिटेच दिली जातात. समजा केडगाव ते मांजरीदरम्यान 15 रुपये तिकीट आहे तर जुने तिकीट तारीख बदलून देण्यात येते किंवा ज्या स्थानकांदरम्यान समान पैसे पडतात, अशांची तिकिटे दिली जातात. तिकिटे संपली असल्यास असे करण्यात येते. -मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग     

घडलेल्या प्रकाराबाबत मी अनभिज्ञ असून चौकशी केल्यानंतरच अधिक भाष्य करू शकेन. प्रवाशांना त्रास होत असल्यास ते चुकीचे असून याबाबत नक्की काय प्रकार होत आहे, याची माहिती घेतली जाईल.  -कृष्णाथ पाटील, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक