Tue, Nov 13, 2018 10:19होमपेज › Pune › आंबेडकर पुरस्काराबाबत सत्ताधार्‍यांकडून भेदभाव

आंबेडकर पुरस्काराबाबत सत्ताधार्‍यांकडून भेदभाव

Published On: Jun 25 2018 1:51AM | Last Updated: Jun 25 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी

वारंवार मागणी करूनही सन 2017-18 च्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराची घोषणा केली जात नाही. यासाठी रोख रक्कमेचे पुरस्कार देण्यासाठी न्यायालयीन आदेशाचे कारण पुढे केले जाते. दुसरीकडे मात्र स्वतः महापौरांकडून इतर रोख स्वरुपातील पुरस्कारांची घोषणा केली जाते. हा दुटप्पीपणा असून आंबेडकर पुरस्काराबाबतीत सत्ताधारी भाजपकडून भेदभाव केला जात आहे, असा आरोप आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.  

वंचित घटकांसाठी आणि आंबेडकरी चळवळीतील योगदान देणार्‍या व्यक्तीस सन 2012-13 पासून महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार देण्याचा प्रस्ताव विद्यमान उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सन 2012-13 मध्ये मांडला होता. त्याला तत्कालीन महापौर आणि पक्षनेत्यांनी मान्यता देऊन हा पुरस्कार देण्यास सुरूवात झाली. पुरस्कार निवड समितीमध्ये महापौर, सर्व पक्षनेते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या प्रमुखांंचा समावेश आहे. पुरस्काराचे स्वरूप 1 लाख 11 हजार 111 रुपये रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे. 

पहिला पुरस्कार दलित पँथरचे संस्थापक आणि कवी नामदेव ढसाळ यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, दलित चळवळीतील नेते राजा ढाले, वसंत साळवे आणि सन 2016-17 चा पुरस्कार 12 जून 2017 रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला. मंजुळे यांना पुरस्कार दिल्यानंतर सन 2017-18 चा पुरस्कार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. या पुरस्काराच्या घोषणेसाठी पक्षनेत्यांची बैठक बोलावण्याची मागणी महापौरांकडे वारंवार करूनही टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत रिपाइंच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.