Tue, Mar 26, 2019 22:04होमपेज › Pune › एड्सग्रस्तांसाठी झटणार्‍या आशा भट

एड्सग्रस्तांसाठी झटणार्‍या आशा भट

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 1:01AMपिंपरी : वर्षा कांबळे 

औद्योगिकपट्ट्यात  मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार येतात. या कामगारांमध्ये गुप्तरोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. अशा स्थलांतरित कामगार, दुर्लक्षित, वंचित व जोखीममध्ये असलेल्यासाठी रिलिफ फाउंडेशनच्या माध्यमातून गेली दहा वर्षे आशा भट या काम करीत आहेत. 

आशा भट यांनी बीएस्सीनंतर मास्टर इन सोशल वर्क करायचे ठरविले. सोशल वर्क करताना पुण्यातील बुधवार पेठेतील देह विक्रय करणार्‍या महिलांसोबत काम केले आणि समाजातील आणखी काही ज्वलंत प्रश्‍न समोर आले. नोकरीच्या शोधात आलेले विवाहित व अविवाहित लोक लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी देहविक्रय करणार्‍यांच्या संपर्कात येतात. असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे अनेक कामगारांना एड्सची लागण होते. अपुर्‍या ज्ञानामुळे  अनेक जण एचआयव्हीसारख्या आजाराला बळी पडतात. एड्स रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी समाजातील 3 व्यक्तींमधील एक व्यक्ती अशी आहे की, तिला आपल्याला एड्स आहे हे माहित नाही. 

रिलिफच्या माध्यमातून 2007 पासून चाकण व भोसरी एमआयडीसाी विभागात आशा यांनी स्थलांतरीत कामगार व जोखीममध्ये असलेल्या एड्स आणि एचआयव्हीग्रस्तांबरोबर काम करण्याचे ठरविले. 

स्थलांतरित कामगार वर्गाच्या खूप अडचणी आहेत. अस्वच्छ वातावरणामुळे आरोग्याबाबत दुर्लक्ष होते. त्यामुळे घरापासून दुरावलेली एखादी व्यक्ती देहविक्रय करणार्‍या महिलेकडे लैंगिक भूक भागविण्यासाठी जाते. तिथून त्याला एचआयव्हीची लागण होते आणि वर्षातून एखादेवेळी जेव्हा तो गावी जातो त्यावेळी त्याच्यापासून त्याच्या पत्नीला एचआयव्हीची लागण होते. अशा एचआयव्हीग्रस्तांना शास्त्रीय माहिती देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मार्गदर्शन  केले जाते. 

एचआयव्हीबाधित व्यक्तींनी या आजाराला समर्थपणे सामोरे जावे यासाठी तळागाळातदेखील आश्‍वासक वातावरण निर्माण करण्यासाठी रिलिफ फाउंडेशनच्या माध्यमातून अशाप्रकारे सर्व स्तरातील लोकांपर्यंत योग्य संदेश पोचविण्याचे काम आशा भट करत आहेत. आशा यांच्या कार्यासाठी नुकताच त्यांना महिला बालविकास कल्याण मंत्रालय भारत सरकारतर्फे सामाजिक कार्यासाठी राष्ट्रीय नारी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

 

Tags : Pimpri, Pimpri news, Aasha Bhat, AIDS,