पिंपरी : प्रतिनिधी
आधार निराधार असल्याबाबत न्यायालयाने वारंवार फटकारले तरी सरकार सगळीकडे आधार कार्डची मागणी करत आहे. मात्र आधार ची यंत्रणा सक्षम नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आधार कार्डमध्ये दुरुस्तीसाठी प्रपंच करूनही ऑनलाईन प्रोसेस इरर दाखवत असल्याने नागरिकांना आता काय करावे असा प्रश्न पडला आहे.
आधार विरोधात अनेक जण न्यायालयात गेले आहेत. तरीही सरकारचा हटवादीपणा कायम आहे. पॅनकार्ड, रेशनिंग कार्ड, गॅस, विविध सवलतींसाठी, ड्रायव्हिंग लायसन्स साठी आधार कार्डची सक्ती केली जात आहे. मात्र दुसरीकडे नव्याने आधार कार्ड देण्यासाठी किंवा आधार कार्डात राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर, नावातील चुका दुरुस्तीसाठी सक्षम यंत्रणा नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील पिंपरी चिंचवड महापालिकेची अनेक आधार केंद्रे बंद आहेत. या कामासाठी उपलब्ध मशिन बंद पडतात अशा तक्रारी आहेत. त्यामुळे आधाराची सुविधा जेथे उपलब्ध आहे. त्या केंद्रावर तोबा गर्दी होत आहे. याला तोंड देत लोक आधारसाठी मोठया रांगा लावून आधार नोंदणी अथवा दुरुस्तीचे काम करून घेत आहेत. आधार दुरुस्तीचे काम योग्यरीत्या होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
प्रशिक्षित कर्मचार्यांचा अभाव
आधारमध्ये दुरुस्ती झाल्यास आठ दिवसात मेसेज पाठवला जातो. मात्र ज्यांची दुरुस्तीची विनंती रिजेक्ट करण्यात आली आहे. त्यांना मेसेज पाठविला जात नाही. त्यामुळे हे काम प्रोसेसमध्ये आहे असे नागरिकांना वाटते. नंतर आधार दुरुस्तीसह कार्ड प्रिंटिंगसाठी ऑनलाईन आधार स्टेटस पाहिले असता ‘प्रोसेस इरर’ असा मेसेज दिसतो. पुन्हा त्याच कामासाठी व आधार दुरुस्तीसाठी नागरिकांना आधार केंद्रात हेलपाटे मारावे लागत आहेत योग्यरीत्या दुरुस्तीसाठी आधार केंद्रावर प्रशिक्षित कर्मचारी का नियुक्त केले जात नाहीत ? त्यांच्या चुकांचा सामान्यांना मनस्ताप कशाला असा संतप्त प्रश्न नागरिक करत आहेत.
Tags : Pimpri, Pimpri news, Aadhar card, work, ineligible,