Thu, Jul 18, 2019 14:25होमपेज › Pune › पाच दिवस आधार केंद्र ‘शटडाउन’

पाच दिवस आधार केंद्र ‘शटडाउन’

Published On: Feb 10 2018 1:53AM | Last Updated: Feb 10 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी 

बँक खाते, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक आदींसाठी आधार लिंक करण्याची मुदत दि. 31 मार्चपयर्र्ंत मुदतवाढ देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून आधार नोंदणी यंत्रणेत तांत्रिक बिघाड होत असून, जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात देशभरातील आधार नोंदणी यंत्रणा कोलमडली होती. त्यात दुरुस्ती करण्यात आली. मात्र, पुन्हा सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, किमान पुढील पाच दिवस नोंदणी ठप्प असणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

आधार नोंदणी करण्याचे काम जवळपास 92 टक्‍के पूर्ण झाले आहे. परंतु, त्यात झालेल्या चुका दुरुस्ती करण्यासाठी केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे, अशातच देशातील आधारच्या मुख्य सर्व्हरमधील सेक्युअर्ड फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलमध्ये (एसएफटीपी) तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यभरातील आधार नोंदणीची यंत्रणा ठप्प झाली आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून आधार नोंदणी व दुरुस्तीचे काम बंद आहे. ही यंत्रणा दुरुस्त होऊन काम पूर्ववत होण्यासाठी आणखी किमान पाच दिवस लागतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

केंद्र व राज्य शासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक असणे बंधनकारक केले. आधार नोंदणी केंद्रातील मशीनवर नोंदणी झाल्यावर त्यामधील डेटा हा आधारच्या मुख्य सर्व्हरला पाठविण्यात येतो. सेक्युअर्ड फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने आधार मशिनमधील डेटा हा मुख्य सर्व्हरमध्ये पाठविला जाण्यास अडचणी येत होत्या. जर पाच दिवस मशिनमधील डेटा सर्व्हरमध्ये अपलोड झाला नाही, तर आपोआप मशिन बंद पडतात. ही समस्या राज्यात सर्वत्र जाणवत आहे. मागील दिवसांपासून आधार नोंदणीचे काम पूर्णपणे बंद आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील केंद्रांवर आधार नोंदणी आणि दुरुस्ती संथगतीने विस्कळित सुरू होते. मात्र शनिवारपासून पुण्यासह राज्यभरात आधार नोंदणी आणि दुरुस्ती सेवा पूर्णत: बंद पडली. आधार नोंदणी अथवा दुरुस्ती बुधवारी सुरू होण्याची शक्यता आहे. जर तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यास लवकर सुरू होईल, असा विश्‍वास आधारचे नोडल अधिकारी तथा तहसीलदार विकास भालेराव यांनी व्यक्‍त केला आहे.