होमपेज › Pune › हॉलिवूडपट पाहून त्यांनी पळविली एटीएम मशिन्स

हॉलिवूडपट पाहून त्यांनी पळविली एटीएम मशिन्स

Published On: Jan 11 2018 1:10AM | Last Updated: Jan 10 2018 11:55PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

हॉलिवूडचा ‘फास्ट अँड फ्युरिअस’ या चित्रपटातील कारनामे पाहून चक्क त्यांनी केवळ अडीच मिनिटांमध्ये एटीएम मशिन अलगद पळविण्याची यंत्रणाच बनविल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. स्कॉर्पिओ जीपमध्ये मॉडिफिकेशन करत या चोरट्यांनी कोंढवा परिसरातील दोन एटीएम आणि त्यातील लाखो रुपयांची रोकड त्यांनी पळविली. पुणे पोलिसांनी त्याच जीपचा माग काढून पाचही कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद केले. कोंढवा पोलिसांनी त्यांच्याकडून पुण्यासह इतर राज्यातील एटीएम चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत, अशी माहिती परिमंडळ चारचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दिलीप आनंद मोरे (वय 52, रा. कोल्हापूर), शिराज महम्मूद बेग जमादार (वय 41), मोहीद्दीन जाफर बेग जमादार (वय 53), दादापीर मुकदमदार तहसीलदार (वय 38,) आणि मलिकजान कुतुबुद्दीन हनिकेरी (वय 52, सर्व रा. जि. बेळगाव, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

कोंढव्यात खडी मशिन चौकात असणार्‍या अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम मशिन 30 डिसेंबर आणि त्यापूर्वी 8 ऑक्टोबर 2017 रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. दोन्ही वेळी हेच एटीएम चोरून नेण्यात आले होते. विशेष म्हणजे, पूर्ण एटीएम मशिन आणि त्यातील एकूण 19 लाख रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली होती. दरम्यान, एटीएम मशिनच चोरटे घेऊन गेल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलिस आरोपींचा शोध करत होते. 

पोलिसांनी दोन्ही वेळेचा चोरीचा प्रकार नीटपणे अभ्यासला. त्यावेळी त्यांना जीपच्या टायरचे ठसे मिळाले. ते एकाच ठिकाणी आणि त्याच पद्धतीने असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी पोलिसांना दिलीप मोरे याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्याला कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता, त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी इतर चार आरोपींना बेळगाव येथून ताब्यात घेतले. दिलीप मोरे याच्यावर बेळगाव येथे वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे.

वाहनचोरीच्या या गुन्ह्यात त्याला बेळगाव येथील न्यायालयात नेले होते. त्याचवेळी त्याची शिराज याच्यासोबत ओळख झाली. दोघांची इतरांसोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांनी चोर्‍या करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून दोन कार, चोरलेली एटीएम मशीन आणि इतर साहित्य असा लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. 
ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त प्रदिप देशपांडे, परिमंडळ चारचे उपायुक्त दिपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मिलींद गायकवाड, उपनिरीक्षक संतोष शिंदे, कर्मचारी अजीम शेख आणि त्यांच्या पथकाने केली.  

मास्टर माईंड कोल्हापूरचा

दिलीप मोरे मूळचा कोल्हापूर येथील आहे. त्याचे महालक्ष्मी मंदिराजवळ यात्री निवास आहे. तो या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आहे. त्याने हा सर्व प्लॅन तयार केला. त्याच्यावर यापूर्वीचे वाहन चोरी, चंदन चोरी आणि एटीएम चोरी असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान त्याच्यावर 18 लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. चोरीतील पैशातून त्याने कर्जाची काही रक्कम भरली असल्याचे उपायुक्त साकोरे यांनी सांगितले.