Mon, Jun 01, 2020 01:47होमपेज › Pune › ‘आप’कडून महाराष्ट्रातील ‘नायका’चा शोध

‘आप’कडून महाराष्ट्रातील ‘नायका’चा शोध

Published On: Sep 06 2018 1:42AM | Last Updated: Sep 06 2018 12:49AMदेशात भ्रष्टाचार संपविण्यासाठी आम आदमी पक्षाचा (‘आप’चा) जन्म झाला असून, भ्रष्ट्राचार मुक्तीची सुरुवात देशाची राजधानी दिल्लीतून करण्यात आली. त्याचे फलित म्हणून दिल्लीमध्ये 70 पैकी 67 जागा जिंकून ‘आप’ने काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला. त्यानंतर पंजाब विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला सत्ता मिळाली नाही. मात्र, पहिल्या प्रयत्नात 20 आमदार निवडून आणता आले. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची ‘आप’ने महाराष्ट्रात तयारी सुरू केली आहे. पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम सुरू असून, ‘मिशन सीएम’साठी मुलाखती घेतल्या जात आहेत. मोहिमेचा पहिला टप्पा पुण्यात पूर्ण झाला आहे. मुंबई आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये टप्या-टप्प्याने ‘मिशन सीएम’साठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. दिल्लीनंतर ‘आप’ने महाराष्ट्राच्या नायकाचा शोध सुरू केला आहे. 

- समीर सय्यद

राज्यात ‘आप’ने पक्ष संघटन आणि विस्ताराचे काम सुरू केले आहे. जानेवारी महिन्यात सिंदखेड राजा येथे झालेल्या सभेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी निवडणुका लढविण्याचा इरादा जाहीर केला होता. त्याच कार्यक्रमात माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला असून, सध्या सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र ‘आप’चे काम सुरू आहे. राज्यात सर्व जिल्ह्यात जिल्हा निरीक्षकांच्या आणि 288 पैकी 100 विधानसभा मतदार संघामध्ये कमिट्यांच्या नेेमणुका करण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच आप युथ विंग, छात्र युवा संघर्ष समिती, श्रमिक विकास संघटन, आप महिला विंग, आप ट्रान्सपोर्ट विंग सुरू करण्यात आले आहेत.  

देशाला एक नव्हे अनेक केजरीवालांची गरज असून, महाराष्ट्राला सुद्धा केजरीलांसारख्या व्यक्तीची गरज आहे. त्यामुळे ‘आप’ आता सामान्य माणसांमध्ये मुख्यमंत्र्यांचा शोध घेत आहे. त्यासाठी मुलाखती घेतल्या जात असून, त्यामध्ये प्रत्येकाला संधी देऊन स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाणार आहे. आपले आचार, विचार, बोलणे, चालणे, नेतृत्वगुण ह्या सगळ्यासाठी आपकडून मेहनत घेतली जाणार आहे. पुण्यामध्ये 70 जणांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी मुलाखती दिल्या आहेत. 

यापुढे मुंबई आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ‘मिशन सीएम’साठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुका राज्यात ‘आप’ लढविणार असल्याचे ‘आप’चे प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले.

भ्रष्टाचाराविरोधात लढणारे पक्ष म्हणून ‘आप’कडे पाहिले जाते. राज्य पातळीवर करणारी फळी निर्माण केली जात आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रामध्ये कमिट्या स्थापन केल्या जात आहेत. तसेच यातून लोकसभा आणि विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत राज्यात पक्ष संघटनांचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.