Tue, Jun 18, 2019 20:17होमपेज › Pune › स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी

स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी

Published On: Sep 07 2018 1:05AM | Last Updated: Sep 06 2018 11:48PMपिंपरी : प्रतिनिधी 

पावसाळा हा स्वाइन फ्लूच्या विषाणूंना पोषक ऋतू असतो. त्यामुळे स्वाइन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. वातावरणातील बदलामुळे संशयित रुग्ण आणि मृतांच्या आकडेवारीत देखील वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी (दि. 6) स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी गेला असून, आतापर्यंत  मृतांचा आकडा 14 वर गेला आहे. तर नवीन 8 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 

स्वाइन फ्लूचा कहर शहरामध्ये वाढत असल्याचे चित्र आहे. आत्तापर्यंत स्वाइन फ्लूचे 87 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 14 जणांचा बळी गेला आहे. त्यात पुन्हा गुरुवारी (दि. 6)  वायसीएम रुग्णालयात रहाटणीतील 39 वर्षीय इसमाचा स्वाइन  फ्लूने मृत्यू झाला आहे. 3 सप्टेंबर रोजी इसमाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसर्‍या दिवशी रुग्णास स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान उपचार सुरू असताना  गुरुवारी त्याचा  मृत्यू झाला. 

स्वाइन फ्लूने दिवसेंदिवस बळी जाणार्‍यांची संख्या वाढत आहे. स्वाइन फ्लूच्या केसेस पुन्हा समोर येत आहेत. दररोज एक तरी पॉझिटिव्ह रुग्ण सापडतो किंवा एखाद्या रुग्णांचा मृत्यू होतो, अशी परिस्थिती आहे. शहरामध्ये स्वाइन फ्लूने रोज एका तरी रुग्णाला जीव गमवावा लागत आहे ही चिंताजनक बाब आहे. 

महापालिकेकडून स्वाइन  फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आठही रुग्णालयांत सर्व औषधे आणि लसीकरण उपलब्ध आहेत. सध्या ढगाळ वातावरण, पाऊस, कडक ऊन या वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लू आणखीन सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर बचाव आणि सावधगिरीच यावरील उपाय आहे असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. बदलत्या वातावरणापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अनिवार्य आहे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे. 

कधीपर्यंत राहतो व्हायरस?

स्वाइन फ्लूचा एचएन व्हायरस स्टील, प्लास्टिकमध्ये 24 ते 48 तास, कपडे, पेपरमध्ये ते 12 तास, टिश्यू पेपरमध्ये 15 मिनिटे, हातांमध्ये 30 मिनिटांपर्यंत कार्यरत राहू शकतो. हे व्हायरस डिटर्जंट, अल्कोहोल, ब्लीच वा साबणाद्वारे नष्ट केले जाऊ शकतात. यासाठी हातांची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.

शहरात स्वाइन फ्लूबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर साथीला आळा घालण्यासाठी डॉक्टरांनी आतापासूनच अति नाजूक प्रकृती असणार्‍या रुग्णांना स्वाइन फ्लूची प्रतिबंधात्मक लस देण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये गर्भवती, ज्येष्ठ नागरिक, पाच वर्षांच्या आतील मुले; तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. पावसाळी वातावरण हे स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठी पोषक असते. नागरिकांनीही खबरदारीचा उपाय म्हणून स्वाइन फ्लूची लस घ्यावी, असे आवाहन सर्वांना केले जात आहे. आम्ही महाविद्यालय, अंगणवाडी, बचतगट याठिकाणी जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टराकडे जावे. - डॉ. लक्ष्मण गोफणे (वैद्यकीय अधिकारी)