Mon, Mar 25, 2019 09:45होमपेज › Pune › थर्टीफस्टसाठी साडेआठ हजार पोलिस तैनात

थर्टीफस्टसाठी साडेआठ हजार पोलिस तैनात

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 1:16AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वरिष्ठ अधिकार्‍यांसह साडेआठ हजार पोलिसांचा ताफा शहरात तैनात असणार आहे. तर,  ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, मद्यपान करून वाहने चालविणार्‍यांवर जोरदार कारवाई करण्यात येणार आहे.   

शहरात नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. थर्टी फस्टच्या रात्री सर्वांकडून वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन करण्यात येते. दरम्यान काही ठराविक भागात आणि रस्त्यांवर तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यात रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडण्याची शक्यता आहे. विशेष करून हॉटेल्स परिसरात सायंकाळनंतर गर्दी होते. दरम्यान नववर्षाचे स्वागत शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. 

स्थानिक पोलिसांना अलर्ट राहून योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, गुन्हे व विशेष शाखेची 23 पथके तयार करण्यात आली आहेत. त्यातील नऊ पथके प्रत्येक झोनला बंदोबस्ताच्या मदतीसाठी देण्यात आली आहेत. दहा पथके शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणी ही पथके राहणार आहेत. छेडछाड, महिलांना त्रास देणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी महिला अधिकार्‍यांची चार पथके तयार करण्यात आली आहे. प्रत्येक झोनला एक पथक देण्यात आले आहे. या पथकामध्ये दहा महिला कर्मचारी एक अधिकारी राहणार आहे. तसेच, राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत चार पथके राहून कारवाई करणार आहेत. 

फग्युर्सन रोड, कॅम्प परिसर, कल्याणीनगर या भागात होणारी गर्दी पाहता त्या ठिकाणी पोलिसांची कुमक ठेवली जाणार आहे. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त रवींद्र कदम यांच्यासह दोन अतिरिक्त आयुक्त, नऊ पोलिस उपायुक्त, 17 सहायक आयुक्त, दीडशे पोलिस निरीक्षक, साडेसात हजार पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. नागरिकांनी मद्यपान करून वाहने चालवू नयेत. अडचण आल्यास तत्काळ जवळच्या पोलिसांकडे संपर्क साधा किंवा पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे यांनी केले. 

ड्रंक अँड ड्राईव्ह विशेष मोहीम

नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात मद्यपान करून दुचाकी तसेच चारचाकी वाहने सुसाट चालवली जातात. अशा मद्यपींवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अचानक थांबून वाहतूक पोलिसांकडून ब्रेथ अ‍ॅनालायझरने तपासणी करण्यात येणार आहे. शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत जवळपास तीनशे जणांवर कारवाई करण्यात आली आहे. रविवारीही ही कारवाई मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले आहे. वाहतूक विभागातील 84 अधिकारी 739 कर्मचारी वाहतूक नियमनांसाठी रस्त्यावर असणार आहेत.