Sun, Jun 16, 2019 02:11होमपेज › Pune › एप्रिलअखेर २५१ पासपोर्ट कार्यालये सुरू करण्याचे लक्ष्य

एप्रिलअखेर २५१ पासपोर्ट कार्यालये सुरू करण्याचे लक्ष्य

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

सध्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 5 टक्के लोकांकडे पासपोर्ट आहे. हे चित्र बदलण्यासाठी पोस्ट खात्याच्या सहकार्याने देशातील विविध शहरात पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. या मोहिमेअंतर्गत एप्रिलअखेर देशात 251 पासपोर्ट कार्यालये सुरू करण्याचे लक्ष पूर्ण करण्यात येणार असून आतापर्यंत सुमारे 181 ठिकाणी पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यात आल्याची माहिती भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी रविवारी पुणे येथे दिली. 

विदिशा विचार मंचतर्फे आयोजित ‘भारताचे पासपोर्ट धोरण : परकीय चलनाचा राजमार्ग’ या विषयावरील विशेष वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, विदिशा विचार मंचच्या संचालिका ममता क्षेमकल्याणी, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे सहकार्याध्यक्ष रघुनाथ येमुल, ज्येष्ठ उद्योजक कल्याण तावरे आदी उपस्थित होते. 

डॉ. मुळे म्हणाले की, एकेकाळी प्रतिष्ठेचे प्रतिक मानले जाणारे पासपोर्ट ही आता प्रत्येक नागरिकाची गरज बनली आहे. महाराष्ट्रात पासपोर्ट मिळण्यासाठी सध्या सुमारे वीस दिवसांचा कालावधी लागतो, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणात केवळ तीन ते चार दिवसात पासपोर्ट मिळतो. महाराष्ट्रातही हा कालावधी कमी करण्यासाठी आम्ही सध्या प्रयत्नशील आहोत. ही यंत्रणा लोकाभिमुख करत तिचे लोकशाहीकरण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यासंदर्भात पोलिस यंत्रणेबरोबरचा समन्वय अधिक सक्षम करण्यात येत असून त्यामुळे पासपोर्ट मिळविण्यासाठीचा वेग वाढण्यास निश्चितच हातभार लागणार आहे. 

नागरिकांनी देखील याविषयी जागरुकता बाळगून पासपोर्टच्या माध्यमातून आपल्याला मिळणार्‍या प्रगतीच्या संधींचा लाभ घेतला पाहिजे. या पार्श्वभूमीवर विविध देशांशी असलेले भारताचे मैत्रिपूर्ण संबंध महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मुक्त व्यापार धोरण, कला, शिक्षण, साहित्य आणि संस्कृतीची देवाणघेवाण, पर्यटन विकास अशा अनेक माध्यमातून परकीय चलन भारतात येत आहे. तसेच यानिमित्ताने अनेक संधी उपलब्ध होत आहे, असेही डॉ. मुळे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ममता क्षेमकल्याणी यांनी केले. तर सचिन ईटकर यांनी आभार मानले. 

अर्ज करणार्‍यांमध्ये कोल्हापूर देशपातळीवर आघाडीवर

सध्या शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा विविध कारणांमुळे परदेशात जाणार्‍या भारतीयांची संख्या वाढत आहे. पासपोर्ट ही प्रत्येक नागरिकाची गरज झाली असून नागरिकांना कमीत कमी वेळेत आणि घरबसल्या पासपोर्ट मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. देशात सध्या पासपोर्टसाठी अर्ज करणार्‍यांमध्ये कोल्हापूर हे देशपातळीवरील आघाडीचे शहर असल्याची माहिती डॉ.  मुळे यांनी दिली.

 

Tags : pune, pune news, passport, passport office, Dnyaneshwar Mulay,


  •