Thu, Jul 18, 2019 21:42होमपेज › Pune › महापौरपदासाठी भाजपमध्ये जोरदार मोर्चेबांधणी 

महापौरपदासाठी भाजपमध्ये जोरदार मोर्चेबांधणी 

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 28 2018 1:05AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये अनेक नगरसेवक तीव्र इच्छुक आहेत. या पदासाठी इच्छुकांनी थेट दिल्लीसह मुंबईतील पदाधिकारी मंत्र्यांना साकडे घातले आहे. त्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.  सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने भाजपचे पहिले महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी (दि.24) आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या पदासाठी विशेषत: महापौरपदासाठी अनेक जण सरसावले आहेत. वर्षभरात लोकसभा  आणि विधानसभा निवडणुका आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदास आणखी

महत्त्व प्राप्त झाले आहे. हे प्रतिष्ठीत पद पदरारात पाडून घेण्यासाठी स्थानिक नेत्यांसह दिल्ली व मुंबईच्या वार्‍याही काही जणांनी केल्या आहेत. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह इतर पदाधिकारी व मंत्र्यांशी इच्छुकांनी संपर्क साधला आहे. तसेच, भाजपसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्‍यांचीही मनधरणी केली जात आहे. इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेता सत्ताधारी भाजपमध्ये तीव्र स्पर्धा रंगली आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, पक्षाचे सहयोगी अपक्ष आमदार महेश लांडगे आणि निष्ठावंत असे 3 गट भाजपमध्ये आहेत. त्या गटाच्या कोणत्या नगरसेवकाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते याची उत्सुकता वाढली आहे.  

आमदार जगताप गटाचे समर्थक शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, शशिकांत कदम, आमदार लांडगे गटाचे समर्थक राहुल जाधव, संतोष लोंढे, वसंत बोराटे आणि भाजप निष्ठावंत गटाचे  नामदेव ढाके, शीतल शिंदे हे महापौरपदासाठी तीव्र इच्छुक आहेत.  सध्या स्थायी समिती अध्यक्षपद आमदार जगताप यांच्या गटाकडे आहे. तर, महापौरपद आमदार लांडगे गटाकडे होते. हे सूत्र कायम राहिल्यास आमदार लांडगे गटाच्या समर्थक नगरसेवकाची वर्णी लागू शकते. तसेच, भाजपने नगरसेविकांना अधिक पदावर संधी देण्याचे धोरण अंवलबले आहे. त्यामुळे ऐनवेळी नगरसेविकेची निवडीची  शक्यता नाकारता येत नाही.

कोअर कमिटी करणार नाव निश्चित 

महापौर व उपमहापौरपदासाठी योग्य नगरसेवकांचे नाव पक्षाची कोअर कमिटी नाव निश्चित करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सहमतीनंतरच अंतिम नाव मंगळवारी (दि.31) घोषित केले जाईल. त्यानुसार ते अर्ज दाखल करतील, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शुक्रवारी (दि.27) दिली. महापौरपद ओबीसी वर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे ओबीसी जातीचे प्रमाणपत्र असलेल्या नगरसेवकास प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.