Tue, Jul 23, 2019 06:19होमपेज › Pune › गरोदर सावत्र मुलीवर चाकूने सपासप वार

गरोदर सावत्र मुलीवर चाकूने सपासप वार

Published On: Jun 11 2018 1:25AM | Last Updated: Jun 11 2018 1:21AMपुणे : प्रतिनिधी

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून वडिलांनी सात महिन्यांच्या गरोदर असलेल्या सावत्र मुलीला व तिच्या बाळालाही संपवतो असे म्हणत भरदिवसा रस्त्यावर चाकूने गळ्यावर, पोटावर आणि पाठीवर वार केल्याचा खळबळजनक प्रकार मॉडेल कॉलनीत घडला. भरदिवसा महिलेवर वार झाल्याची घटना घडली असताना चतुश्रृंगी पोलिसांकडून घटना खरी आहे, की खोटी तपासण्याच्या नावाखाली गुन्हाच दाखल केला गेला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे. शनिवारी दुपारी पॉलटेक्नीकल ग्राऊंडसमोर हा प्रकार घडला आहे. 

दीपिका शहा (वय 31, रा. कोरेगांव पार्क) असे याघटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी दीपिका यांचे पती प्रताप वारे (वय 36) यांनी दीपिकांचे वडिल अजित शहा आणि त्यांचा नोकर रशीद शेख यांच्याविरोधात चतुश्रृंगी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. परंतु, अद्याप  गुन्हा दाखल केला गेलेला नाही.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित शहा यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दीपिका यांच्या आईसोबत विवाह केला.  दीपिका यांच्या आईचेही पहिले लग्न झालेले असून, दीपिका या पहिल्या पतीची मुलगी आहे. 

दीपिका यांचा प्रताप वारे यांच्यासोबत पाच वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला आहे. या विवाहाला अजित शहा यांचा विरोध होता. परंतु, त्यांनी नोंदणीकृत विवाह केला आहे. दरम्यान लग्नानंतर त्या आईला भेटण्यासाठी घरी येत असत. त्यावेळी त्यांच्यात भांडण होत असे. दीपिका या सात महिन्यांच्या गरोदर आहेत. त्या शनिवारी दुपारी आईला भेटण्यासाठी घरी निघाल्या होत्या. त्यावेळी अजित यांनी तिला मॉडेल कॉलनीतील पॉलिटेक्नीकल ग्राऊंडजवळ अडविले. तसेच, त्यांच्यात घरी जाण्यावरून भांडण झाले. त्यावेळी त्यांनी तुलाही आणि मुलालाही ठार मारतो, असे म्हणत गळ्यावर, पोटावर आणि पाठीवर चाकूने वार केले. त्यानंतर चतुश्रृंगी पोलिसांना याघटनेची माहिती देण्यात आली.

तसेच, दीपिकाा यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर दीपिकांच्या पतीने तत्काळ पोलिसांकडे तक्रार दिली. परंतु, पोलिसांकडून गुन्हा दाखल न करता मुलीच्या वडिलांना बोलविण्यात आले. त्यानंतर त्यांची बाजू म्हणून घटनाक्रम विचारण्यात आला. तसेच, त्यांचा जबाबही नोंदवून घेतला. शनिवारी दुपारी घडलेल्या घटनेनंतर आणि रविवारी पूर्ण दिवस चौकशी करण्यात आली. परंतु, रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांना नेमकी घटना खरी की खोटी, हे समजू शकले नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.