होमपेज › Pune › ‘मेट्रो’ला पावणेतीन हेक्टर जागेसाठी एक रुपया भाडे

‘मेट्रो’ला पावणेतीन हेक्टर जागेसाठी एक रुपया भाडे

Published On: Dec 29 2017 1:37AM | Last Updated: Dec 29 2017 1:36AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

स्वारगेट येथील महापालिकेच्या पाणीपुरवठ्याची 2.80 हेक्टर जागा महामेट्रोला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. तब्बल 60 कोटी रुपये किमतीची जागा महामेट्रोला 1 रुपया नाममात्र भाडेदराने देण्याचे प्रशासनाने या प्रस्तावात नमूद केले. या जागेवर मेट्रोचा डेपो आणि वाहतुकीचे एकात्मिक स्थानक उभारण्यात येणार आहे.

महामेट्रोकडून पुणे मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यात स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गाचा समावेश आहे. या मेट्रो मार्गावर स्टेशन, पार्किग अशा विविध कारणांसाठी महामेट्रोने महापालिकांकडे जवळपास 16 जागांची मागणी केली आहेत. त्यात स्वारगेट येथे मेट्रोचा डेपोस्थानक उभारण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या जागेची प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार या चौकातील वापरण्यात नसलेली जवळपास 28 हजार चौरस मीटर जागा महामेट्रोला देण्याचा प्रस्ताव भूमी जिंदगी प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

महापालिकेच्या जागा भाड्याने देताना त्या निविदा काढून देण्याची तरतूद आहे. मात्र महामेट्रो या कंपनीत खासगी आणि शासकीय यांचे प्रत्येकी 50 टक्के भागभांडवल आहे. त्यामुळे ही जागा भाड्याने देताना त्यासाठी निविदा प्रकिया न राबविता महामेट्रोकडून मागणी करण्यात आल्यानुसार देण्यात येणार आहे. तीस वर्ष कालावधीसाठी ही जागा देण्यात येणार आहे. 

सध्याच्या बाजारभावानुसार या जागेची किंमत 60 कोटी 59 लाख 20 हजार इतकी आहे. महापालिकेच्या 2008 च्या तरतुदीच्या नियमाप्रमाणे जागा भाड्याने देण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. त्यावर स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी निर्णय होणार आहे.