Wed, Aug 21, 2019 15:07होमपेज › Pune › मावळ आणि शिरूर जिंकूच ! गार्‍हाणी न सांगता कामाला लागा : उद्धव ठाकरे 

मावळ आणि शिरूर जिंकूच ! गार्‍हाणी न सांगता कामाला लागा : उद्धव ठाकरे 

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 15 2018 1:04AMपिंपरी ः प्रतिनिधी

शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे व शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काम चांगले आहे. त्यामुळे मावळ व शिरूर पुन्हा जिंकूच! त्या दिशेने कामाला लागा. गटप्रमुखांपर्यंत नियुक्त्या करा, गार्‍हाणी सांगत बसू नका, असे प्रतिपादन  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत केले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.  पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात या आढावा बैठका झाल्या. सकाळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख राम गावडे, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख योगेश बाबर, शहर महिला संघटिका सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.

मावळातील बैठकीत बोलताना ठाकरे म्हणाले की,  खासदार श्रीरंग बारणे यांचे काम चांगले आहे.लोकसभेत अनेक विषयांवर त्यांनी आवाज उठविला आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे.  ताकद आणखी घट्ट करा. मावळातून शिवसेनेचा खासदार सलग दोनदा निवडून आला आहे. आता हॅटट्रिक करायची असून, त्यासाठी तन आणि मनाने कामाला सुरुवात करण्याच्या सूचना ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. गटप्रमुखांपर्यंत नियुक्त्या करा, गार्‍हाणी सांगत बसू नका, असा आदेश ठाकरे यांनी दिले.

शिरूरच्या बैठकीत बोलताना आढळराव  म्हणाले, थेऊर येथील साखर कारखाना आणि शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यतीचा प्रश्न सोडविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. परंतु, शिवसेना मित्रपक्ष असून, सरकारमधील भाजपचे मंत्री प्रतिसाद देत नाहीत. दुजाभाव करतात. पुणे जिल्ह्यात काम करीत असताना पालकमंत्री गिरीश बापट देखील शिवसेनेला सहकार्य करत नाही. पक्षपातीपणाची वागणूक देतात. अनेक मंत्री देखील विकासकामांबाबत पाठपुरावा करूनही कोणताही प्रतिसाद देत नाहीत, अशी तक्रार शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पक्षप्रमुखांकडे केली. 

त्यावर उद्धव ठाकरे यांनी थेऊर येथील साखर कारखाना आणि शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यतीचा प्रश्नांसह प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण स्वत:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांशी बोलू, असे सांगितले. ठाकरे यांनी आढळराव यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांच्या विरोधात शिरूर लोकसभा मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे; मात्र विधानसभा मतदारसंघावर देखील शिवसेनेचा भगवा फडकू शकतो. त्यादृष्टीने कामाला लागा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.