Mon, Apr 22, 2019 12:21होमपेज › Pune › ‘एसआरए’ला गती मिळण्यासाठी झोपडपट्टीधारकांचे नव्याने सर्वेक्षण

‘एसआरए’ला गती मिळण्यासाठी झोपडपट्टीधारकांचे नव्याने सर्वेक्षण

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 12:37AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील झोपडपट्टीधारकांचे आता पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ‘लिडर’ या तंत्रज्ञानाचा वापर करून  अत्याधुनिक संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार्‍या या सर्वेक्षणात पात्र झोपड्या आणि झोपडपट्टीधारक यांची पात्रता निश्‍चित केली जाणार आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) राबविताना येणार्‍या अडचणी दूर होण्यास मोठी मदत मिळणार आहे.शहरात एकूण 486 झोपड्या आहेत. या झोपड्यांमधील रहिवाशांचे पुनर्वसन करून त्यांना हक्‍काचे घर मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने एसआरए प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या योजनेंतर्गत पात्र झोपडपट्ट्यांमधील झोपडीधारकांची पात्रता निश्‍चित करून झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन केले जाते. 

मात्र, या योजनेत झोपडीधारकांची पात्रता निश्‍चित करणे हा सर्वात मोठा अडचणीचा मुद्दा असतो. अनेकदा त्याअभावी योजना रखडतात, त्याचा फटका झोपडपट्टीधारकांना बसतो. त्यामुळे आता एसआरए प्राधिकरणाकडून अत्याधुनिक पध्दतीने शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करून झोपडपट्टीधारकांची पात्रता निश्‍चित केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात एसआरए योजना राबविताना कोणती झोपडी पात्र हे आधीच माहिती असल्याने त्यात अडथळा येणार नाही. त्याचबरोबर बोगस लाभार्थी घुसविण्याच्या  प्रकारांना आळा बसण्यास मोठी मदत मिळणार आहे.

झोपड्यांची संख्या 1 लाख 64 हजार

शहरात मान्यताप्राप्त सुमारे 486 झोपडपट्ट्या, 1 लाख 64 हजार 778 घरे आहेत, तर रहिवाशांची संख्या 8 लाख 82 हजार आहे. त्यामुळे महापालिकेने या सर्वेक्षणासाठी प्रभाग व वॉर्डनिहाय अधिकारी; तसेच सभासदांशी संपर्क साधून या सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करावे, अशी मागणी एसआरएने केली आहे. 

एसआरएच्या 242 योजना प्रस्तावित

एसआरएच्या 242 योजना प्रस्तावित आहेत. त्यात 12 हजार 374 घरे प्रस्तावित आहेत. मात्र, त्यातील केवळ 47 योजनांचेच बांधकाम पूर्ण झाले आहे, तर 46 योजनांचे बांधकाम सुरू आहे; तसेच सुमारे 36 योजना दप्तरी दाखल करण्यात आल्या आहेत.