Tue, Jul 16, 2019 02:05होमपेज › Pune › पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाची आज दिल्लीत बैठक

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाची आज दिल्लीत बैठक

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 23 2018 12:34AMपुणे : प्रतिनिधी

पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णयासाठी दि. 23 रोजी दिल्ली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतरच पुरंदरच्या अधिसूचनेला हिरवा कंदील मिळेल, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाचे संचालक सुरेश कंकानी यांनी दै. ‘पुढारी’बरोबर बोलताना सांगितली. 

कंकानी म्हणाले, पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार्‍या गावांमधील महसूल अभिलेख पुन्हा अद्ययावत करण्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन खात्याने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला दिले आहेत. त्यामुळे हे काम झाल्यानंतरच विमानतळासाठी भूसंपादन करण्याबाबतची अधिसूचना राज्य शासनाकडून काढली जाणार आहे. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत विमानतळ विकास कंपनीला विशेष प्राधिकरणाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने अध्यादेश काढण्याचे आदेशदेखील दिले आहेत.  

पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, वनपूर, कुंभारवळण आणि उदाचीवाडी अशा सात गावांच्या जागेत पुरंदर विमानतळ होणार आहे. या गावातील महसूल अभिलेख अद्ययावत करण्यात आले आहेत. परंतु, हे अद्ययावतीकरण करून आठ महिने उलटले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा संबंधित गावातील महसूल अभिलेख अद्ययावत करण्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला दिले आहेत. त्यानुसार एक आठवड्याच्या आत कंपनीकडून जमिनींचे गट आणि सर्वेक्षण क्रमांक यांची छाननी करण्यात येणार आहे. याबरोबरच जमीन संपादनापूर्वी महसुली अहवाल  अद्ययावत करणे, टायटल सर्च करणे, प्रत्यक्ष वहिवाट, सातबारा उतार्‍यांची प्रक्रिया पूर्ण करणे, जमीन मालकांची अधिग्रहणासाठीची संपादन संमती घेणे, त्यांना मोबदल्याचे पर्याय देणे ही कामे करावी लागणार आहेत.

कंकानी म्हणाले, विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठविण्यात आला आहे. विमानतळासाठीच्या जमीन संपादन प्रक्रियेच्या कार्यपद्धतीचे टप्पे निश्‍चित करणे, या प्रक्रियेसाठी प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांची नेमणूक करणे, जमीन अधिग्रहणासाठीची अधिसूचना प्रसिद्ध करणे, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या पर्यायांना मान्यता देणे अशा धोरणात्मक बाबींवर दिल्ली येथे बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

Tags : pune, pune news, Purandar International Airport, Delhi, meeting,