Sun, Mar 24, 2019 23:44
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छुकांची मावळातून जोरदार तयारी

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छुकांची मावळातून जोरदार तयारी

Published On: Apr 25 2018 2:01AM | Last Updated: Apr 25 2018 1:25AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

राष्ट्रवादीतर्फे मावळातून इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.  मागील लोकसभा निवडणुकीत लढू की नको या संभ्रमावस्थेत शेवटी शांत बसणे पसंद केलेले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे तसेच ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी तयारीस वेग दिला आहे. वाघेरे यांनी रविवारी पिंपरीत एका लॉन्सवर घेतलेले गेट टूगेदर ही लोकसभेची तयारी असल्याची चर्चा होती. वाघेरे यांनी मात्र हल्लाबोलच्या श्रम परिहारासाठी हे गेट टूगेदर घेतल्याचे सांगितले.

कै. भिकू वाघेरे त्यांचे चिरंजीव संजोग वाघेरे यांनी शहराचे महापौरपद भूषविले. उषाताई वाघेरे या स्थायीच्या अध्यक्षा होत्या. संजोग वाघेरे यांना आमदार व्हायचे होते. मात्र पिंपरी राखीव झाल्याने त्यांनी 2014 मध्ये लोकसभेची तयारी सुरू केली आहे. कर्जत , उरण, पनवेलमध्ये असलेला संपर्क, मावळ, पिंपरी, चिंचवडमधील नातीगोती,कामगार वर्गाचे मोठे मतदान , याबाबी लक्षात घेवून आपल्याला उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी पक्षाकडे केली.

दरम्यान, अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात आघाडी सरकारला अपयश आल्याचे कारण देत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शेकापच्या तिकिटावर व मनसेच्या पाठिंब्यावर रिंगणात उडी घेतली.  मात्र तेेच राष्ट्रवादीचे छुपे उमेदवार असल्याची चर्चा रंगल्याने वाघेरे यांनी शांत राहणे पसंद केले. शिवसेनेतून आयात केलेल्या राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली. या निवडणुकीत  शिवसेनेचे तत्कालीन खासदार गजानन बाबर यांचा पत्ता कापून उमेदवारी मिळविलेले श्रीरंग बारणे हे 5 लाख 12 हजार 226 मते मिळवून विजयी झाले.  जगताप याना 3 लाख 54 हजार 829 तर राष्ट्रवादीचे  नार्वेकर याना 1 लाख 83 हजार 293 मते मिळाली.

गेल्या लोकसभेपासून आ.  जगताप, महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे अशा दिग्गजांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पालिका निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. सत्ता गमवावी लागल्याने राष्ट्रवादीत नैराश्य आले.  मात्र भोसरी व काळेवाडी येथे हल्लाबोल आंदोलनांतर्गत सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने राष्ट्रवादी इच्छुकांत उत्साह आहे. वाघेरे यांनी रविवारी गेट टूगेदर घेतले यावेळी पक्षाचे आजी, माजी नगरसेवक ,पदाधिकारी उपस्थित होेते.  त्यावेळी ही लोकसभेची तयारी असल्याची चर्चा होती. मागील लोकसभेला काँग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष व राष्ट्रवादीचे विद्यमान स्वीकृत सदस्य भाऊसाहेब भोईर यांनाही राष्ट्रवादीची ऑफर होती.  मात्र त्यावेळी धाडस न केलेले भोईर यावेळी काही राजकीय समिकरणे जुळवत चाचपणी करीत आहेत. 

Tags : Pimpri, lot,  enthusiasm,  NCP